हिंजवडी मेट्रो दिवाळीआधी सुरु होण्याची शक्यता (File Photo)
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता ऑक्टोबरपर्यंत लागू असल्याने या प्रकल्पाचे उद्घाटन महिनाभर लांबणीवर पडले होते. आचारसंहिता संपल्यानंतर तत्काळ सेवा सुरू करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) वेगवान हालचाली केल्या असून, राज्य सरकार व मुख्यमंत्री कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) टप्प्याटप्याने तपासणी पूर्ण करून सुरुवातीच्या १२ आणि नंतरच्या ५ अशा एकूण १७ स्थानकांवर प्रवासी वाहतूक सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. उर्वरित ६ स्थानकांची कामे डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून, पुढील वर्षी मार्चअखेर संपूर्ण मार्गावरील सर्व स्थानके पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होतील.
दरम्यान, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या मेट्रो मार्गावरील आणखी पाच स्थानकांना रेल्वे मेट्रो सुरक्षा आयुक्तांकडून (CMRS) सुरक्षा मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे एकूण २३ पैकी १७ स्थानकांवर प्रवासी सेवा सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे.
आयटी कर्मचाऱ्यांसह पुणेकरांना दिलासा मिळण्याची अपेक्षा
बाणेर, बालेवाडी, औंध आणि शिवाजीनगर परिसरातून हजारो नागरिक हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करण्यासाठी जात असतात. अशा सर्व कर्मचाऱ्यांना या मेट्रोचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावरील रस्त्यांवर वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढतच चालले होते. त्यामुळे अनेक प्रवाशांना तासन् तास प्रवासातच वेळ घालवावा लागत होता. पण ही मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होण्यास आणि रस्त्यांवरील वाहनांचा ताण कमी करण्यास मदत होऊ शकते.






