
तीन दिवसांपासून पुणे शहरात पावसाने पुन्हा धरला जोर
प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला
शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज
पुणे/सुनयना सोनवणे: गेल्या तीन दिवसांपासून पुणे शहरात पावसाने पुन्हा जोर धरला असून शुक्रवारी (ता. २४) दिवसभर ढगाळ वातावरणासह अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. सायंकाळनंतरही पावसाची रिपरिप सुरूच राहिल्याने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला, तर विविध भागांत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. गुजरात किनारपट्टीपासून अरबी समुद्रापर्यंत सक्रिय झालेल्या पूर्व-पश्चिम द्रोणीय रेषा आणि तीव्र झालेल्या मान्सून वाऱ्यांमुळे उत्तर कोकण, नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात काही ठिकाणी खूप जोरदार, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली असून या भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Maharashtra Rain Alert: राज्यावर भीषण संकट! ‘या’ भागांमध्ये मुसळधार पाऊस; खडकवासला धरणातून…
शनिवारी (ता. २५) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून तेथेही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शुक्रवारी पुणे शहरात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. शनिवारी कमाल तापमान २८ अंश, तर किमान २३ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज असून आकाश सामान्यतः ढगाळ राहील. शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असली, तरी घाटमाथ्यावर जोरदार ते खूप जोरदार पावसाचा इशारा कायम आहे.
ठिकाण – पर्जन्यमान (मिमी)
कुर्वंडे – ७७.५
गिरिवन – ६४.५
भोर – २५.०
तळेगाव – २५.०
चिंचवड – २२.०
माळीण– ११.०
एनडीए – ९.५
पाषाण – ७.६
दापोडी – ७.०