अरे देवा! राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण-घाटमाथ्यासह 'या' जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, बुधवारी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांसाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट, तर काही जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाडमधील मुसळधार पावसाने पूल गेला वाहून, रस्ता बंद
सध्या बंगालच्या उपसागरात आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर चक्रीय वाऱ्यांची प्रणाली सक्रिय आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरापासून दक्षिण गुजरातपर्यंत कमी दाबाचा लांब पट्टा (ट्रफ) तयार झाला आहे. याच प्रणालीमुळे गुजरातच्या काही भागांसह महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथा परिसरात मुसळधार पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारपर्यंत कोकण आणि घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. याशिवाय संपूर्ण विदर्भात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
मात्र पुण्यात पावसाची दमदार बॅटिंग शुक्रवार आणि शनिवारपासून पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तरीही नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, नदी-नाले आणि पूरप्रवण भागांपासून दूर राहावे तसेच अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत अनेक भागांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला असून, काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे. २१ जुलै २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून २२ जुलै २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत झालेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार कुरवंडे येथे सर्वाधिक ९६.५ मिमी पाऊस झाला. कुरवंडेनंतर गिरीवन येथे ६७.० मिमी, तर भोर येथे ५३.५ मिमी पावसाची नोंद झाली. या भागांमध्ये दिवसभर अधूनमधून जोरदार सरी कोसळल्याने ओढे-नाले वाहू लागले आणि वातावरणात गारवा निर्माण झाला.
पुणे शहरातही अनेक भागांत चांगला पाऊस झाला. पाषाण येथे ४९.८ मिमी, एनडीए परिसरात ४९.० मिमी, चिंचवडमध्ये ४८.५ मिमी आणि शिवाजीनगर येथे ३७.५ मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय दापोडीमध्ये ३६.० मिमी, तळेगावमध्ये २८.० मिमी, तर कोरेगाव पार्कमध्ये २५.५ मिमी पाऊस झाला. सततच्या पावसामुळे शहरातील काही सखल भागांत पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस पुणे जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
देशातील 23 राज्यात पाऊस, महाराष्ट्रासह 3 राज्यात रेड अलर्ट तर 10 राज्यात ऑरेंट अलर्ट






