फिडर सेवा देण्याची मनसेची मागणी (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे: शहरात लाखों कोटी रुपये खर्च करून मेट्रो प्रकल्प उभा केला आहे. परंतु त्यांच्या स्थानकांपर्यंत येण्यासाठी प्रवाशांना कसलीही सुविधा नाही. विशेषत: कोथरूड परिसरातील प्रवाशांना त्याचा सर्वाधिक त्रास होत आहे, त्यामुळे महामेट्रो कंपनीने तत्काळ ही सेवा कोथरूडमधील वेगवेगळ्या ठिकाणांहून मेट्रो स्थानकांपर्यंत सुरू करावी, अशी मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महामेट्रो कंपनीला देण्यात आले.
मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस तसेच केदार क़ोडोलीकर, संजय दिवेकर, प्रियंका पिसे, रोहित गुजर, महेश शिर्के, अशोक गवारे, संगीता कुंभार व अन्य पदाधिकाऱ्यांनी महामेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ तसेच जनसंपर्क संचालक हेमंत सोनवणे यांची गुरूवारी सकाळी भेट घेतली. त्यांना या मागणीचे निवेदन दिले. कोथरूड परिसरातून मेट्रोचा नियमित वापर करणारे नागरिकही त्यांच्यासमवेत होते.
संभूस यांनी सांगितले की मेट्रोची नियमित प्रवासी संख्या वाढणे गरजेचे आहे. ती का वाढत नाही याचे प्रमुख कारण मेट्रोच्या स्थानकापर्यंत यायचे कसे? हा प्रश्न आहे. महामेट्रो कंपनीने आधीच स्थानकांजवळ वाहनतळ देण्याची जबाबदारी आमची नाही, असे सांगितले आहे. तसे असेल तर दुचाकी, चारचाकी वाहने लावायची कुठे ही अडचण आहे. प्रवाशांना त्यांच्या घराजवळून स्थानकापर्यंत येण्यासाठी चांगला पर्याय उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र, महामेट्रो कंपनी याचा विचार करायला तयार नाही.
पुणेकरांसाठी खुशखबर! लवकर 200 बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार
पुणे महानगर परिवहन म्हणजेच पीएमपीएलच्या ताफ्यात २०० सीएनजी बस येणार आहेत. संचालक मंडळाच्या बैठकीत टाटा कंपनीच्या बस खरेदीला मंजुरी दिली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली. अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून सीएनजी बस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु होती.
अखेर संचालकांच्या बैठकीत टाटा कंपनीच्या बस खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. कमी किंमतीत या बस मिळणार आहेत. टाटा कंपनीच्या या बसची किंमत ही ४७ लाख रुपये असणार आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत टाटा कंपनीच्या बस खरेदी करण्यासाठी अखेर मान्यता दिली आहे. आता या बस खरेदीसाठी पुणे महानगर पालिका ६० टक्के तर पिपंरी चिंचवड महानगर पालिका ४० टक्के अर्थपुरवठा करणार आहे.
स्वारगेट-कात्रज मार्गावर चार मेट्रो स्थानकं होणार
स्वारगेट ते कात्रज या सुमारे ५.४०० किलो मीटर लांबीच्या मेट्रो मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये मार्केटयार्ड, पद्मावती, कात्रज अशी तीन स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. या मार्गासाठी सुमारे २ हजार ९५४ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पात पुणे महापालिकेचा आर्थिक सहभाग १५ टक्के (४८५ कोटी) असेल. या प्रकल्पासाठी लागणारी जागा महापालिका देणार असून तिची किंमत (२४८ कोटी) असेल.