कराड दक्षिण मतदारसंघाचे आमदार अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर साधला निशाणा (फोटो - सोशल मीडिया)
कराड : मलकापूर नगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने पक्षाचे मनोबल उंचावले असून, शहराच्या विकासाच्या दिशेने मलकापूरची वाटचाल वेग घेत असल्याचे चित्र स्पष्ट होत असल्याचा आनंद आमदार अतुल भोसले यांनी व्यक्त केला. उर्वरित जागाही मतदार बहुमताने निवडून देत नगराध्यक्षपदाचा उमेदवारही विजयाच्या ताकदीने पुढे येईल. त्याचबरोबर कराडचा नगराध्यक्ष ही भाजपचा निवडून येणार असून या ठिकाणी पक्षाला मोठे यश येईल, असा विश्वास आमदार अतुल भोसले यांनी व्यक्त केला.
कराड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आमदार भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. याप्रसंगी या निवडणुकीत काँग्रेसचे आव्हान वाटते का? या प्रश्नावर भोसले म्हणाले, काँग्रेस नगरपालिका निवडणुकीत उभी राहणार की नाही? याबाबतच शंका वाटते. त्यांचा एक गट लढणार, तर दुसरा गट लढणार नाही, अशी परिस्थिती आहे. देशातील जुनी पार्टी आज इतकी गोंधळलेल्या भूमिकेत आहे की, युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या सख्ख्या भावालाही काँग्रेसच्या तिकिटावर अर्ज भरता आला नाही. हे त्यांच्या अंतर्गत विसंवादाचे द्योतक आहे. लोकशाही आघाडी, यशवंत विकास आघाडी आणि शिवसेना शिंदे गटाच्या आघाडीशीच आमचा प्रमुख सामना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : Dharashiv Politics: ड्रग्ज प्रकरणातीला आरोपीला भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी; धाराशिवमध्ये राजकारण तापलं
दरम्यान, माजी उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना भोसले म्हणाले, विधानसभेला जयवंतराव पाटील यांनी मला मदत केली होती. नगराध्यक्षपदासाठी 18 जण इच्छुक होते. पक्षाने कोर कमिटीमार्फत अनुभवी उमेदवाराला संधी दिली. आमदार म्हणून कुणालाही शब्द देण्याचा मला अधिकार नव्हता. त्यामुळे फसवणुकीचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
35 वर्षांपासून पक्षासाठी पावसकर यांचं सातत्याने काम
विनायक पावसकर यांच्या उमेदवारीबाबत बोलताना ते म्हणाले, गेल्या 35 वर्षांपासून पक्षासाठी पावसकर यांनी सातत्याने काम केले. कठीण काळातही त्यांनी भाजपाचे चिन्ह पुढे नेले. विधानसभेत त्यांनी प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले. त्यामुळेच त्यांची निवड न्याय्य आहे. कराडचा नगराध्यक्ष भाजपचाच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उपजिल्हा रुग्णालय अत्याधुनिक करण्यासाठी प्रयत्न
शहराच्या सर्वांगीण विकासाविषयी बोलताना आमदार भोसले म्हणाले, उपजिल्हा रुग्णालय अत्याधुनिक करण्यासाठी, ट्रामा केअर सेंटर आणि रीड डेव्हलपमेंट, शहरातील रस्ते, वाहतूक, पार्किंग, पाणीपुरवठा या मूलभूत सुविधांचे नियोजन सुधारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच प्रीतीसंगम बागेचे रीड डेव्हलपमेंट, नेकलेस रोड प्रकल्प, नदीकाठ संरक्षण भिंत बांधणी या सर्वांचा समावेश असलेला मेगाप्लॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आला असून, प्रस्ताव प्रगतिपथावर आहे.
…ही तर आमच्या कामाची पावती
मलकापूरमध्ये पाच नगरसेवक बिनविरोध निवडून आले, ही आमच्या कामाची पावती आहे. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न आहे. मनोहर शिंदे आणि अशोकराव थोरात यांना 42 वर्षांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. कराड-मलकापूर दोन्ही ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. मलकापूर आधुनिक शहर उभारणे, हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
चारित्र्य, अनुभव आणि कार्याचा विचार
नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांचा चारित्र्य, अनुभव आणि त्यांनी केलेल्या कामाचा बारकाईने अभ्यास करूनच कोर कमिटीने विनायक पावसकर यांच्या नावाची निवड केली आहे. कुणावर अन्याय झाला नाही. विधानसभेसारखाच विश्वास जनता कराड नगरपालिकेच्या निवडणुकीतही दाखवेल, असे आमदार भोसले यांनी स्पष्ट केले.






