खासदार अमोल कोल्हेंची प्रचारसभा (फोटो- ट्विटर)
पिंपरी: भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणाला गालबोट लावण्याचे काम केले. आतापर्यंत आपल्याला चप्पल ,शर्ट विकत घेता येतो. हे माहीत होते परंतु भाजपने आमदार विकत घेतले. भाजपने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आणि शरद पवार यांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. हे विकले गेले आणि आपल्याला नैतिकतेच्या गोष्टी शिकवतात. दिवसेंदिवस महागाई प्रचंड वाढत आहे. लोकसभेत महाराष्ट्राने यांना हद्दपार केले म्हणूनच यांना लाडकी बहीण आठवली, असा आरोप खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले
महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे भोसरी मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ चिखली येथे शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी माजी नगरसेवक उपस्थित होते.
‘कटेंगे बटेंगे’ महाराष्ट्रात चालत नाही : कोल्हे
खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, उत्तर प्रदेशातल्या तरुणांचा रोजगारासाठी महाराष्ट्रात यावे लागते आणि त्या प्रदेशाचे मुख्यमंत्री आपल्याला कटेंगे बटेंगे सांगतात. रोजगारासाठी तिथल्या तरुणांची आंदोलने पहा. तिथल्या झाशीच्या हॉस्पिटलमध्ये आग लागून बालके मृत्यूमुखी पडतात. म्हणून मला उत्तर प्रदेशच्याया मुख्यमंत्र्यांना सांगावेसे वाटते की, उत्तर प्रदेशातल्या गंगा यमुनेच्या भुसभुशीत मातीत हा वीखारीपणा उगवत असेल. पण हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातींना एकत्र घेऊन बारा बलुतेदारांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं. ही विधानसभा निवडणूक नागरिकांनी हातात घेतली आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही दिसून येणार आहे.
हेही वाचा: आपली लढाई महाविकास नव्हे तर महाअडाणी आघाडी विरोधात ! योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
योगी आदित्यनाथ यांनी दिला ‘कटेंगे बटेंगे’ चा नारा
जातीच्या नावावर वाटण्या करणाऱ्या काँग्रेसने 1947 पासून देशासोबत विश्वासघात केला. काँग्रेसचे अस्तित्व आता संपवण्याची वेळ आली आहे, असा हल्लाबोल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व भाजप नेते योगी आदित्यनाथ यांनी केला होता. भाईंदरच्या सभेतून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कटेंगे तो बटेंगेचा नारा दिला होता. यावरून राज्यात मोठे राजकारण रंगले आहे. महायुतीच्या नेत्यांनी हा मुद्दा उचलून धरल्याचे पाहायला मिळाले.
‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा देत योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांचा समाचार घेतला. योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, महाराष्ट्र ही संत, महापुरुषांची पुण्यभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना एकत्रित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. भारतासाठी ते सदैव प्रेरणादायी आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळगंगाधर टिळक, बाजीराव पेशवे यांनी आदर्श घडवला. त्यांच्या प्रेरणेतून देश व समाजासाठी कार्य केले जात आहे. आपली लढाई महाविकास नव्हे तर महाअडाणी आघाडी विरोधात आहे. ते लव जिहाद, लँड जिहाद सारख्या प्रकाराला प्रोत्साहन देतात. त्यामुळे चुकूनही त्यांचा विचार करू नका. अन्यथा आपले सण गणेशोत्सव, रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक होईल. निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत विभागले जाऊ नका, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले.