सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या व खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी पुण्यातील सारसबागेसमोरील शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या सातत्याने सुरू असलेल्या वक्तव्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. यावेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे प्रमुख उपस्थित होते. संजय राऊत यांच्या वक्तृत्वामुळेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वैचारिक दिवाळखोरी संपूर्ण महाराष्ट्रासमोर उघडी पडली असून, पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना दूर लोटण्यामागे सर्वात मोठे कारण त्यांच्या विषारी आणि अहंकारी भाषेचे राजकारण असल्याचा घणाघात खासदार वाघमारे यांनी केला.
खासदार डॉ. ज्योती वाघमारे म्हणाल्या की, ठाकरे गटातील नेते आणि कार्यकर्ते कथित “खोक्यांमुळे” पक्ष सोडून गेले नसून, पक्षातील असुरक्षित वातावरण, नेतृत्वाचा अभाव आणि संजय राऊत यांच्यासारख्या व्यक्तींच्या सततच्या अपमानास्पद वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या “धोक्यामुळे” त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. आज महाराष्ट्रात सुरू असलेले “ऑपरेशन उबाठा बुडवा” हे विरोधकांनी नव्हे, तर स्वतः संजय राऊत यांनीच त्यांच्या बेताल वक्तव्यांद्वारे सुरू केले असून, प्रत्येक पत्रकार परिषदेत ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची प्रतिमा अधिकाधिक खालावत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
त्या पुढे म्हणाल्या की, संजय राऊत आता ठाकरे गटाचे प्रवक्ते राहिलेले नसून, काँग्रेसची राजकीय सुपारी घेऊन शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने टीका करणारे “सुपारीबाज प्रवक्ते” बनले आहेत. महाराष्ट्राच्या विकासाची चर्चा करण्याऐवजी वैयक्तिक टीका, महिलांबद्दल अवमानकारक भाषा आणि विरोधकांबद्दल अपशब्द वापरणे हीच त्यांची राजकीय ओळख बनली आहे. अशा भाषेमुळे समाजात चुकीचा संदेश जात असून, लोकशाहीतील राजकीय संस्कृतीच कलंकित होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
प्रवक्त्याकडून सातत्याने महिलांचा अपमान
यावेळी खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र, एका बाजूला महिलांच्या सन्मानाबाबत बोलण्याचा आव आणायचा आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या पक्षाच्या प्रवक्त्याकडून सातत्याने महिलांचा अपमान होत असतानाही मौन बाळगायचे, हा ठाकरे गटाचा दुटप्पीपणा असल्याचा आरोप त्यांनी केला. राजकारणात मतभेद असू शकतात; परंतु वैचारिक पातळी सोडून भाषेचा वापर करणाऱ्यांना महाराष्ट्रातील सुजाण जनता कधीही माफ करणार नाही, असा इशाराही खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी दिला.






