संग्रहित फोटो
पिंपरी : पुण्यासह राज्यभरात गुन्हेगारी वाढली असून, पोलिसांकडूनही गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अशातच आता पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. पुणे शहरातील वारजे व उत्तमनगर पोलीस ठाण्यांत १५ गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराने कर्जबाजारीपणातून झटपट पैसे कमावण्यासाठी पिस्तूल विक्रीचा व्यवसाय सुरू केला. मात्र मध्य प्रदेशातून आणलेली तीन पिस्तुले विकण्यापूर्वीच भोसरीतील गावजत्रा मैदानात गुंडा विरोधी पथकाने त्याला अटक केली आहे.
शब्बीर उर्फ मलीक जहाँगीर शेख (वय ३८, रा. कर्वेनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्यासह मध्य प्रदेशातील कथित शस्त्रपुरवठादार पप्पी सिंग याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल शुभम कदम यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस तपासानुसार, शब्बीरवर २०१२ पासून वारजे पोलीस ठाण्यात १४ तर उत्तमनगर पोलीस ठाण्यात एक असे एकूण १५ गुन्हे दाखल आहेत. मुलीच्या उपचारासाठी मोठा खर्च झाल्याने तो कर्जबाजारी झाला होता. २०२३ मध्ये एका गुन्ह्यात अटक झाल्यानंतर येरवडा कारागृहात त्याची बेकायदेशीर शस्त्रविक्री करणाऱ्या आरोपीशी ओळख झाली. त्याच्याकडून मध्य प्रदेशातील शस्त्र पुरवठादार पप्पी सिंग याचा संपर्क क्रमांक मिळाल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
जेलमधून सुटल्यानंतर शब्बीर रिक्षा चालवत होता. मात्र कर्ज फेडण्यासाठी अधिक पैशांची गरज भासल्याने त्याने मध्य प्रदेशातून पिस्तुले आणून पुणे जिल्ह्यात विक्री करण्याचा निर्णय घेतला. १ जून रोजी त्याने पप्पी सिंगशी संपर्क साधला. पिस्तुले खरेदीसाठी कर्वेनगर येथील एका व्यक्तीकडून ४० हजार रुपये व्याजाने घेतले आणि स्वतःकडील रक्कम मिळून तो नाशिक-धुळे मार्गे शिरपूर येथे पोहोचला.
शिरपूरजवळ पाठविण्यात आलेल्या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने त्याच्याकडून ७५ हजार रुपये घेऊन तीन गावठी पिस्तुले आणि सहा जिवंत काडतुसे दिली. हा शस्त्रसाठा घेऊन तो पुण्यात परतला. गुरुवारी (२५ जून) सायंकाळी भोसरीतील गावजत्रा मैदानात ग्राहकाच्या शोधात असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून डमी ग्राहकामार्फत व्यवहाराची खात्री केली आणि शब्बीरला अटक केली. त्याच्याकडून सुमारे १ लाख ६६ हजार १०० रुपयांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे मध्य प्रदेशातील शस्त्रपुरवठा साखळीचा महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला आहे.
थेरगावात तरुणाकडून गावठी पिस्तूल जप्त
थेरगाव परिसरात विनापरवाना गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी सोमीन अमिरखान (वय १८, रा. भोरडेनगर, थेरगाव) याच्याविरुद्ध काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी पहाटे रॉयल बँक्वेट हॉलसमोरील रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल अजय फल्ले यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
बावधनमध्ये दोघांकडून तीन पिस्तुले जप्त
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोनने चांदणी चौक, बावधन येथे कारवाई करून दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक केली. आर्यन प्रकाश जाधव (वय २०, बावधन) आणि ओमकार सचिन मोरे (वय २३, कोथरूड) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून तीन पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. ओमकार मोरे याच्याविरुद्ध चंदननगर, सिंहगड रस्ता आणि कोथरूड पोलीस ठाण्यांत यापूर्वी तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.






