राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी (फोटो- सोशल मिडिया)
पुणे: राम नदी आणि मुळा – मुठा नदीकाठ सुधार याेजनेसंदर्भात विभागीय आयुक्त डाॅ. महेश पुलकुंडवार यांच्याबराेबर लवकरच संयुक्त बैठक हाेणार आहे, अशी माहिती राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे. पुण्यातील नदी सुधार योजनेच्या ४४ किलोमीटर कामातील राम नदी – मुळा नदी संगम येथील जागेची संयुक्त पाहणी खासदार कुलकर्णी यांनी केली. यावेळी महापािलका आयुक्त राजेंद्र भोसले , जीवित नदी संस्थेचे पुणे रिव्हर रिव्हर्सल संस्थेचे शैलजा देशपांडे व अन्य पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुण्यात केंद्राच्या माध्यमातून व राज्य शासनाच्या सहकार्याने नदी सुधार प्रकल्प राबवला जात असून 44 किलोमीटरच्या एकूण कामासाठी सुमारे 4700 कोटी रुपये निधी आवश्यक आहे. या कामाचा एकंदरीत विकास आराखडा झाला असून यात काही त्रुटी आहेत. शिवाय बंडगार्डन येथील कामादरम्यान नदीत भराव टाकून नदीचे पात्र कमी करण्यात आले आहे व 200 वर्षांचे जुनी वृक्षांची कत्तल केली जात आहे. याविषयी केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे तक्रार केल्याची माहीती खासदार कुलकर्णी यांनी केली.
नदीचे पात्र अबाधित ठेवा
राम नदी, मुळा नदी संगम औंध येथे राम नदीवरील भराव टाकणे, मुळा नदीपात्रात 300 ट्रक राडारोडा टाकणे, झाडांवर क्रमांक टाकणे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत भराव टाकण्याचे कंत्राटद्वारामार्फत चालू असल्याचे या पाहणीत स्पष्ट झाले. नदीचे पात्र रुंद असून ते अबाधित ठेवावे व झाडे तोडली जाऊ नये अशी मागणी खासदार कुलकर्णी यांनी केली. या प्रकल्पातील त्रुटीसंदर्भात विभागीय आयुक्त डॉ. महेश पुलकुंडवार यांच्याकडे पुणे महापािलका आणि पिंपरी चिंचवड महापािलका आयुक्त, पर्यावरण स्नेही संस्थांची एकत्र बैठक आयोजित करणार आहे, असे खासदार कुलकर्णी यांनी सांगितले.
‘‘ नदीपात्रात भराव टाकल्याने नदीचे पात्र कमी होऊन मानव निर्मित अडथळे व पावसाळ्यात पुरस्थिती निर्माण होऊन अनेक रहिवासी संस्थांमध्ये पाणी शिरते व जीवनमान विस्कळीत होते. नदीला नैसर्गिक सुंदरता आवश्यक असून भराव सारख्या अनैसर्गिक गोष्टींची बाधा, वृक्षतोड, पक्षांच्या अधिवासाचे नुकसान खपवून घेतले जाणार नाही” असा इशारा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी दिला.
पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत
पुरजन्य परिस्थितीनंतर मुळा-मुठा नदीच्या सुशोभीकरण प्रकल्पाच्या नावाखाली महापालिकेने नदीमध्ये भराव टाकून नदीचे पात्र अरूंद केल्यामुळेच पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले सर्व क्षेत्रातून टिका झाल्यानंतर झोपी गेलेल्या महापालिका प्रशासनाला जाग आली. या आरोप आणि टिकांमुळे पालिकेने कारणे शोधायला सुरूवात केल्यानंतर पालिकेला कर्वे नगर ते शिवणे या भागातील नदीपात्राच्या पुररेषेत सुमारे चार ते पाच एकर क्षेत्रात भुखंड तयार केल्याचे समोर आले. मात्र, प्रत्यक्षात ही जागा १५ ते २० एकर असल्याचे बोलले जात आहे. राडारोड्यामुळे नदीपात्रात एक भींत तयार झाली आहे. या भरावामुळे नदीने तिचे पात्र सोडल्याने सिंहगड परिसरात पाणी शिरल्याचा आरोप केला गेला. पुन्हा बेकायदा भराव टाकून प्लॉट करण्याचे उद्योग सुरू झाले. याकडे लक्ष न दिल्यास भविष्यात पुणेकरांना याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.