तिकीट दरवाढीला होतोय विरोध (फोटो- सोशल मिडिया)
पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) यांनी आपल्या बस सेवांच्या तिकीट दरात वाढ जाहीर केली असून, ही दरवाढ येत्या १ जूनपासून लागू होणार आहे. नव्या दरवाढीत स्टेज रचनेत मोठा बदल करण्यात आला असून, याचा थेट फटका प्रवाशांच्या खिशाला बसणार आहे. विशेष म्हणजे या तिकीट दर थेट दुप्पट आकारण्यात येत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
अयोग्य आणि बेकायदेशीर निर्णय
पीएमपी प्रवासी मंचचे जुगल राठी यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “ही एक प्रकारे आत्महत्या करण्यासारखीच पावले आहेत. तिकीट दरात वाढ करून पीएमटीने उलटी पावले उचलली आहेत. पीएमपीच्या संचालक मंडळात प्रवासी प्रतिनिधी नाहीत, लोकप्रतिनिधी नाहीत. अशा परिस्थितीत हा निर्णय अयोग्य आणि बेकायदेशीर वाटतो. ही वाढ ठेकेदारांच्या घशात घालण्यासाठीच केली जात असल्याची शंका येते.”
अधिकाऱ्यांना गरिबांच्या प्रश्नांची जाण नाही
मानद प्रवासी मंचचे संजय शितोळे म्हणाले, “ही दरवाढ अन्यायकारक आहे. पीएमपीच्या अधिकाऱ्यांना गरिबांच्या प्रश्नांची जाण नाही. हे अधिकारी आमच्या घामाच्या पैशातून येणाऱ्या गाड्यांमध्ये फिरतात, परंतु या भाडेवाढीमुळे दुर्बल घटकांना होणाऱ्या त्रासाची त्यांना बिलकुल जाणीव नाही. यासंदर्भात आमदार, खासदार देखील आवाज उठवत नाहीत, हे दुर्दैव म्हणावे लागेल.”
पीएमपी बसचे संचालन हे पुणे,पिंपरी चिंचवड व पीएमआरडीए क्षेत्रात आहे. १ ते ८० किलोमीटर असा पीएमपीचा संबंधित मार्गावर प्रवास होतो. ८० किलोमीटरच्या प्रवासासाठी पीएमपीए ११ टप्पे ठरविले आहे. त्या टप्पा नुसार दरवाढ झाली आहे. हे दर रविवारच्या पहाटे पासून लागू होणार आहे. तिकीटासह पासच्या दरात देखील पीएमपीने वाढ केली आहे. पीएमपी प्रशासनाने यापूर्वी २०१४ मध्ये दरवाढ लागू केली होती.
– तसेच ज्या पासची वैधता १ जून नंतरच्या पुढील दिनांकापर्यंत असेल तर पासची वैधता असे पर्यंत त्यांना नवीन दर लागू पडणार नाही.
पुण्यात तीन नव्या बसमार्गांची सुरुवात
पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) कडून प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत तीन नवीन बसमार्गांची सुरुवात करण्यात आली असून, एका विद्यमान बसमार्गाचा विस्तार करण्यात आला आहे. या निर्णयामुळे शहरातील विविध भागांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना अधिक सुलभ, नियमित आणि सहज उपलब्ध सार्वजनिक वाहतूक सेवा मिळणार आहे.
बसमार्ग क्रमांक ७९ – हिंजवडी (माण) फेज ३ ते डेक्कन जिमखाना
या मार्गावरील बस हिंजवडी फेज ३ येथून सुरुवात करून इन्फोसिस फेज २, शिवाजी चौक, वाकड ब्रिज, सुतारवाडी, बावधन, चांदणी चौक, कोथरूड डेपो, वनाज कंपनी, एस.एन.डी.टी. कॉलेजमार्गे डेक्कन जिमखान्यापर्यंत धावणार आहे.
बसेसची संख्या : २
वारंवारिता : दर १ तास ४० मिनिटांनी