पुण्यातील रिक्षाचालकांना आरटीओचा इशारा (फोटो- सोशल मिडिया)
 सहा महिन्यांत प्राप्त झाल्या २८२ तक्रारी
आरटीओकडून २०३ तक्रारींचे निवारण
दंडात्मक कारवाईमधून २ लाख २७ हजार रुपये दंड वसूल
चंद्रकांत कांबळे/पुणे: शहरात मोठ्या प्रमाणावर ऑटो रिक्षाचालक मीटरनुसार भाडे न आकारता प्रवाशांकडून थेट मनमानी दराने पैसे वसूल करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ओला-उबेरसारख्या ॲपवर कमी भाडे दिसल्यास अनेक चालक प्रवाशांना प्रवास नाकारतात आणि मीटर वापरण्याऐवजी मनासारखे भाडे मागतात. या पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) मागील सहा महिन्यांत २८२ तक्रारी दाखल झाल्या आहेत.
आरटीओकडून, मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांत दाखल झालेल्या २०३ तक्रारींचे निवारण करण्यात आले असून संबंधित रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करत एकूण २ लाख २७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांतील ७९ तक्रारींची चौकशी सध्या सुरू आहे.
या तक्रारींपैकी सर्वाधिक तक्रारी या जादा भाडे आकारणी आणि भाडे नाकारणे या प्रकारांशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. प्रवाशांकडून या सर्व तक्रारी आरटीओने जारी केलेल्या ८२७५३३०१०१ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर प्राप्त झाल्या आहेत.
Pune News: दिवाळीत RTO ची नियमभंग करणाऱ्या १९८ बसवर धडक कारवाई; 17 लाखांपेक्षा जास्त…
मनमानी भाड्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
पुण्यातील प्रवाशांमध्ये रिक्षाचालकांच्या या मनमानीविरोधात तीव्र नाराजी असून, आरटीओच्या कारवाईनंतरही अशा प्रकारांचे प्रमाण कमी होत नसल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. प्रशासनाने सातत्याने कारवाई वाढवून प्रवाशांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
कोणत्याही रिक्षाचालकांनी नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. प्रवाशाकडून जादा भाडेदर आकारणे, भाडे नाकारणे किंवा इतर तक्रारी असल्यास आपले नाव, मोबाईल क्रमांक आणि फोटोसह ८२७५३३०१०१ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावे. प्राप्त तक्रारींवर तत्काळ कारवाई केली जाईल.
अर्चना गायकवाड,
प्रादेशिक परिवहन अधिकारी,पुणे
मुक्त धोरणामुळे राज्यात रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ओला-उबेर यांसारख्या ॲप टॅक्सी सेवांमुळे स्पर्धा तीव्र झाली आहे. त्यामुळे रिक्षाचालकांनी जास्तीत जास्त चांगली सेवा देऊन प्रवाशांचा विश्वास संपादन करावा. प्रवाशांना नाकारणे किंवा जादा भाडे मागणे हे कोणत्याही चालकाने करू नये. चुकीचे वर्तन करणाऱ्यांना आम्हीही समर्थन देणार नाही.
बाबा शिंदे,
अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य चालक-मालक प्रवास वाहतूक संघटना
पुण्यात वाहतूक होणार अधिक शिस्तबद्ध; RTO कडून घेण्यात आला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय
आम्ही कुटुंबासोबत ट्रॅव्हल्सने वाशीमवरून आल्यानंतर संगमवाडी येथे सकाळी सातच्या दरम्यान आलो. आम्हाला सिंहगड रस्त्याला वडगाव बुद्रुक येथे जायचे होते. तेव्हा रिक्षा चालकांनी आमच्या भोवती गर्दी केली. तेव्हा मीटरने पैसे न सांगता आम्हाला एकदम ४५० रुपये द्यावे लागणार असे रिक्षा चालकांनी सांगितले. आम्ही त्यांना सांगितले की मीटरने १९० ते २०० रुपये होतात. तुम्ही मीटरने पैसे घ्या. तेव्हा रिक्षाचालक म्हणाले की, दिवाळीचा सिझन आहे. आम्हालाही कमाई करून घ्यायची असते.
-पल्लवी कव्हर-पाटील, प्रवासी






