पुण्याला वाढीव कोट्यातील पाणी कधी मिळणार ? (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे: वीस वर्षाहून अधिक कालावधी उलटला तरी पुणे शहराला वाढीव पाणी काेटा अद्याप मंजुर केला गेला नाही. शहराची लाेकसंख्या ७० लाखाच्या घरात पाेहचली असुन, पुण्याची वर्षभराची तहान भागविण्यासाठी २१ टिएमसी इतकी पाण्याची गरज आहे. वाढीव काेटा मंजुर करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. पुणे शहराचे क्षेत्रफळ हे लगतची गावे समाविष्ट केली गेल्याने वाढत आहे. १९९७ साली महापािलका हद्दीत ३८ गावे समाविष्ट केली गेली. त्यानंतर वीस वर्षानंतर ११ आणि त्यानंतर २३ गावे महापालिका हद्दीत समाविष्ट केली गेली.
पुणे शहराचा पाणी पुरवठा हा खडकवासला धरण साखळीवर अवलंबुन आहे. या धरण साखळीतील चारही धरणांची एकुण साठवण क्षमता ही २९ टिएमसी इतकी आहे. त्याचवेळी हवेली, दाैंड, इंदापुर आदी तालुक्यातील शेतीसाठी या धरणांतून कालव्याद्वारे पाणी पुरवठा केला जाताे. वीसहून अधिक वर्षापुर्वी पुणे शहराला जलसंपदाविभागाने सुमारे साडे अकरा टिएमसी इतका पाणी पुरवठा मंजुर केला हाेता. शहराचा हाेणारा विस्तार, वाढणारी लाेकसंख्या लक्षात घेत पुणे महापािलकेने वेळाेवेळी पाण्याचा काेटा वाढवून मिळावा अशी मागणी जलसंपदा विभागाकडे केली आहे. त्यामागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. दरम्यान जलसंपदा विवभागाकडून पुणे शहराला साडे चाैदा टिएमसी इतका काेटा मंजुर असल्याचा दावा केला जात आहे. पण प्रत्यक्षात पुण्याची तहान भागविण्यासाठी वर्षाला २१ टिएमसी इतकी पाण्याची गरज असल्याचा दावा पुणे महापािलका करीत आहे.
हेही वाचा: Pune Water News: पुण्यात ‘पाणी’ पेटणार! ७१४ काेटी रुपये न भरल्यास…; महानगरपालिकेला नोटीस
दरवर्षी कालवा समितीच्या बैठकीत महापािलकेकडून वाढीव काेटा मिळविण्यासाठी वाॅटर बजेट मध्ये मागणी केली जात असते. पुणे महापािलकेने पाणी पुरवठ्यासाठी उचललेल्या पाण्याच्या बदल्यात प्रक्रीया केलेले साडे सहा टिएमसी पाणी मुंढवा जॅकवेल येथून जलसंपदा विभागाला द्यावे अशी अट घातली गेली आहे. या अटीची पुर्तता करण्याचा प्रयत्न महापािलका करीत असली तरी जलसंपदा विभागाकडून त्या प्रमाणात पाणी उचलले जात नसल्याची माहिती पुढे आली हाेती.
अन्य पर्यायांचा विचार
शहराचा विस्तार लक्षात घेऊन शहराच्या उत्तर पुर्व भागात असलेल्या नगर रस्ता परीसरात भामा आसखेड प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जात आहे. चार वर्षांपुर्वी ही याेजना कार्यान्वित झाली. मुळशी धरणातूनही पाच टिएमसी पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पडून आहे. हे पाणी मिळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार हे सातत्याने सांगत आहे. परंतु, अद्याप त्यावर ठाेस मार्ग निघाला नाही.
इतर स्त्राेतांचा उपयाेग करणार ?
महापािलकेच्या हद्दीत काही गावे समाविष्ट झाली असुन, या गावांच्या लगत काही तलाव आहेत. या तलावांतील पाण्याचा उपयाेग पाणी पुरवठ्यासाठी करता येईल का ? याचा विचार करणे गरजेेचे अाहे. कात्रज तलाव, जांभुळवाडी तलाव आदींचे पाणी प्रदुषित हाेत असुन, ते राेखण्यासाठी कठाेर उपाययाेजना करणे आवश्यक आहे. तसेच कात्रज घाट परीसरातही लघु बंधारा बाधण्याचा विचार काही वर्षांपुर्वी पुढे आला हाेता. अशा विविध पर्यायी स्त्राेतांवरही विचार हाेणे गरजेचे आहे.