पुणे महामेट्रोकडून प्रवाशांसाठी ऑनलाईन ‘लॉस्ट अँड फाउंड’ सुविधा सुरू(फोटो-सोशल मीडिया)
चंद्रकांत कांबळे/पुणे : पुणे महामेट्रोकडून प्रवाशांच्या सोयीसाठी ऑनलाईन लॉस्ट अँड फाउंड सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मेट्रो प्रवासादरम्यान एखादी वस्तू स्टेशनवर किंवा मेट्रोत विसरल्यास, ती वस्तू आता ऑनलाईन पाहता येणार आहे. पुणे मेट्रोच्या अधिकृत वेबसाइटवरील पॅसेंजर इन्फॉर्मेशन या विभागात लॉस्ट अँड फाउंड या पर्यायामध्ये ही सुविधा देण्यात आली आहे.
महामेट्रो प्रशासनाकडून सर्व मेट्रो स्थानकांवर विसरलेल्या वस्तूंची माहिती ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये बॅग, पैसे, पर्स, ओढणी, ओळखपत्रे तसेच इतर विविध वस्तूंचा समावेश आहे. बहुतांश ठिकाणी प्रवाशांकडून बॅग विसरल्या जाण्याच्या घटना अधिक आढळून येत आहेत. ज्यांची वस्तू हरवली आहे, त्यांनी महामेट्रोच्या वेबसाइटवर जाऊन संबंधित वस्तूची माहिती तपासावी आणि ज्या स्थानकावर ती वस्तू उपलब्ध आहे, त्या स्थानकाशी एक महिन्याच्या आत संपर्क साधावा.
महामेट्रोमध्ये एखादी वस्तू हरवल्यास, प्रवाशांनी तात्काळ जवळच्या मेट्रो स्थानकावरील स्टेशन कंट्रोलर, तिकीट काउंटर किंवा सुरक्षा रक्षकांना माहिती द्यावी. याशिवाय, हेल्पलाईन क्रमांक १८०० २७० ५५०१ वर कॉल करता येईल.तसेच मेट्रोच्या अधिकृत वेबसाइटवरील लॉस्ट अँड फाउंड विभागात किंवा क्युआर कोड स्कॅन करूनही तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे. वस्तू परत घेताना प्रवाशांना ओळखपत्र (आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ.) आणि प्रवासाचा पुरावा सादर करावा लागतो.
एखादी वस्तू सापडल्यास ती संबंधित स्टेशन कंट्रोलरकडे नोंदवली जाते. त्यानंतर त्या वस्तूची माहिती सर्व स्थानकांना कळवली जाते. संबंधित वस्तूसोबत संपर्क क्रमांक किंवा ओळखपत्र उपलब्ध असल्यास, संबंधित व्यक्तीशी थेट संपर्क साधण्यात येतो. ओळख पटल्यावरच वस्तू परत केली जाते. हरवलेल्या वस्तूची मागणी एक महिन्याच्या आत करणे आवश्यक असून, सहा महिने वस्तू जतन करून ठेवण्यात येतात. त्यानंतर त्या वस्तूंची योग्य ती विल्हेवाट लावण्यात येते.
प्रवाशांच्या सुविधेसाठी महामेट्रोकडून ऑनलाईन लॉस्ट अँड फाउंड सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एखादी वस्तू विसरल्यास प्रवाशांनी ऑनलाईन तपासणी करून संबंधित विभागाशी संपर्क साधावा आणि आपली वस्तू परत मिळवून घ्यावी. चंद्रशेखर तांबवेकर, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो, पुणे






