देशातील पहिला ‘ट्रेकिंग आणि रॉक क्लायंबिंग’ क्रेडिट कोर्स(फोटो-सोशल मीडिया)
पुणे : पुस्तकी ज्ञानासोबतच साहसी वृत्ती आणि नेतृत्वगुणांचा विकास व्हावा, या उद्देशाने संगमनेर येथील ‘अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालया’ने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. महाविद्यालयाने पुण्यातील ‘गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग’ (जीजीआयएम) यांच्या सहकार्याने ‘इंट्रोडक्शन टू सह्याद्री ट्रेकिंग अँड रॉक क्लायंबिंग’ हा विशेष अभ्यासक्रम यशस्वीपणे राबविला आहे. गिर्यारोहण या विषयाला अधिकृत ‘क्रेडिट कोर्स’ (शैक्षणिक श्रेयांक) म्हणून मान्यता देणारा हा देशातील पहिलाच प्रयोग ठरला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी २०२०) अंतर्गत बहुआयामी शिक्षणाचा भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विविध शाखांमधील १२२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या अभ्यासक्रमाची संकल्पना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांची असून, यास संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, विश्वस्त डॉ. सुधीर तांबे, शरयू देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संघभावना आणि निसर्गाविषयी संवेदनशीलता निर्माण करणे हा यामागील मुख्य हेतू आहे.
प्रशिक्षणाच्या शेवटी लेखी व तोंडी परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना आता अधिकृत शैक्षणिक श्रेयांक प्रदान करण्यात येणार आहेत. या अभ्यासक्रमादरम्यान सह्याद्रीचा इतिहास, भूगोल, किल्ल्यांची वास्तुरचना, गिर्यारोहणातील संज्ञा आणि माउंटन मॅनर्स यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच खांडगाव रॉक क्वारी येथे रॉक क्लायंबिंग, रॅपलिंग, जुमारिंग आणि गिर्यारोहणातील गाठींचे प्रशिक्षण यासह प्रथमोपचार आणि सुरक्षेचे सखोल ज्ञान यावेळी देण्यात आले.
या अभ्यासक्रमासाठी एव्हरेस्टवीर भूषण हर्षे, विवेक शिवदे, कृष्णा ढोकले यांच्यासह पवन हडोळे, अक्षय भोगाडे व ‘जीजीआयएम’च्या अनुभवी प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले. ‘जीजीआयएम’चे संस्थापक संचालक उमेश झिरपे यांनी या उपक्रमासाठी महत्त्वाची भूमिका बजावली, तर ज्येष्ठ गिर्यारोहक श्रीकांत कासट यांचे सहकार्य केले.






