हडपसर बनणार पुण्याचे ‘बुलेट ट्रेन हब’ (फोटो- istockphoto
बुलेट ट्रेनच्या नकाशावर पुण्याचे महत्त्व वाढणार
हडपसर बनणार पुण्याचे ‘बुलेट ट्रेन हब’
प्रकल्पाचा अंदाजे खर्च ४ हजार कोटी रुपये
पुणे: बुलेट ट्रेनच्या नकाशावर पुण्याचे महत्त्व वाढणार असून, हडपसर परिसराला पुण्याचे बुलेट ट्रेन हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे. मुंबई–पुणे आणि पुणे–हैदराबाद या प्रस्तावित उच्चगती रेल्वे मार्गांसाठी हडपसर येथे भव्य स्थानक उभारण्याची योजना असून, या प्रकल्पाचा अंदाजे खर्च ४ हजार कोटी रुपये असल्याची माहिती पुढे येत आहे.
केंद्र सरकारच्या हाय-स्पीड रेल्वे धोरणांतर्गत पुण्याला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात आवश्यक जागा उपलब्ध नसल्याने आणि वाहतूक कोंडीचा विचार करता, हडपसर हा पर्याय पुढे आला आहे. पुणे–सोलापूर महामार्गालगत असलेला हा परिसर रस्ता, रेल्वे आणि भविष्यातील मेट्रो नेटवर्कशी सहज जोडला जाणार असल्याने येथे बुलेट ट्रेन स्थानक उभारणे अधिक व्यवहार्य ठरत आहे.
या प्रकल्पाअंतर्गत मुंबई–पुणे आणि पुणे–हैदराबाद हे दोन उच्चगती मार्ग एकत्रितपणे हाताळले जाणार आहेत. दुहेरी ट्रॅक, अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा आणि ३०० ते ३५० किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या गाड्या, अशी या बुलेट ट्रेनची वैशिष्ट्ये असतील. लोणावळा परिसरातील भौगोलिक मर्यादा लक्षात घेता, त्या भागात स्थानक टाळून कामशेत परिसरात थांबा देण्याचा पर्यायही चर्चेत आहे.
हडपसरमधील बुलेट ट्रेन स्थानकामुळे पुणे शहराच्या पूर्व भागाचा चेहरामोहरा बदलणार आहे. आयटी पार्क, औद्योगिक वसाहती आणि वाढत्या गृहनिर्माण प्रकल्पांना या हाय-स्पीड कनेक्टिव्हिटीचा मोठा फायदा होणार आहे. तसेच, हिंजवडी परिसरातही स्वतंत्र स्थानक उभारण्याचा विचार सुरू असून, त्यामुळे शहराच्या पूर्व–पश्चिम भागांमध्ये वेगवान दळणवळण उपलब्ध होणार आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई–पुणे प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होईल, तर पुणे–हैदराबाददरम्यानही जलद व सुरक्षित प्रवास शक्य होणार आहे. उद्योग, व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळत पुण्याच्या विकासाला नवा वेग मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
1500 किमी अंतर फक्त ६ तासांत; या दोन शहरांदरम्यान धावणार भारतातील दुसरी बुलेट ट्रेन
1500 किमी अंतर फक्त ६ तासांत
मुंबई ते अहमदाबाद भारतात पहिला बुलेट ट्रेन मार्ग जपानच्या मदतीने निर्माण होत असून लवरच या मार्गावर ट्रेन धावणार आहे. त्यानंतर आता देशभरात बुलेट ट्रेन धावण्याची शक्यता आहे. कारण भारतात दुसऱ्या बुलेट ट्रेन मार्गाचं काम सुरू झालं असून १५०० किमी फक्त साडे सहा तासांत कापता येणार आहे. दिल्लीहून हावडापर्यंत ही ट्रेन धावणार आहे.






