वैभव सूर्यवंशीला बाबर आझमचा विक्रम मोडण्याची संधी(फोटो-सोशल मीडिया)
IND U19 vs AFG U19, U19 World Cup 2026 : आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज भारत १९ वर्षांखालील संघ विरुद्ध अफगाणिस्तान १९ वर्षांखालील संघ यांच्यात दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे सुरू आहे. या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भारतीय १९ वर्षांखालील संघाचा स्फोटक खेळाडू वैभव सूर्यवंशीला या सामन्यात इतिहास रचण्याची संधी आहे. या स्पर्धेत आतापर्यंत वैभव सूर्यवंशीने ३९ पेक्षा जास्त सरासरीने १९६ धावा फटकावल्या आहेत. त्याला बाबर आझमचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
जर वैभव सूर्यवंशी अफगाणिस्तानविरुद्ध मोठी खेळी करण्यात यशस्वी ठरला, म्हणजेच जर त्याने शतक झळकवले तर तो एकाच वेळी दोन मोठ्या कामगिरी पार करू शकतो. यामध्ये त्याला १९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यांमध्ये सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनू शकतो, तर दुसरीकडे, पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमचा विक्रम देखील त्याला मोडता येणे शक्य आहे.
वैभव सूर्यवंशीने उपांत्य फेरीत शतक ठोकत, १०३ किंवा त्याहून अधिक धावा केल्या तर तो बाबर आझमचा १९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यांतील धावांचा विक्रम मोडू शकतो. बाबरने त्याच्या १९ वर्षांखालील कारकिर्दीत १२७१ धावा फटकावल्या आहेत. याचा अर्थ उपांत्य सामना केवळ भारतीय संघासाठीच नाही तर वैभव सूर्यवंशीच्या भावी कारकिर्दीसाठीही मैलाचा दगड ठरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : IND U19 vs AFG U19 : अफगाणिस्तानसमोर भारताची अभेद्य भिंत! TOSS जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय
दरम्यान, १९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यांमध्ये सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम बांगलादेशच्या अझीझुल हकीमच्या नावावर जमा आहे. त्याने ३७ सामन्यांपैकी ३५ डावात १२६१ धावा फटकावल्या आहेत. दुसरीकडे, वैभव सूर्यवंशीने फक्त २३ सामन्यातच ११६९ धावा केल्या आहेत आणि तो यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. विशेष म्हणजे वैभव सूर्यवंशीची सरासरी ५० पेक्षा जास्त आहे आणि त्याचा स्ट्राईक रेट देखील १५८ पेक्षा जास्त आहे, जो १९ वर्षांखालील एकदिवसीय इतिहासातील कोणत्याही फलंदाजापेक्षा सर्वोत्तम मानला जात आहे. बांगलादेश स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे, उपांत्य फेरीत वैभव सूर्यवंशीला अझीझुल हकीमला पिछाडीवर टाकण्याची संधी आहे. हे साध्य करण्यासाठी त्याला ९३ धावांची आवश्यकता असणार आहे.






