सौजन्य - नवराष्ट्र टीम
लोणावळा : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या लोणावळा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगतचे अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे केले. काही ठिकाणी रस्त्यांची आवश्यक कामेही तातडीने करण्यात आली. त्यामुळे नेहमी वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या लोणावळेकरांना व्हीआयपी दौऱ्याच्या निमित्ताने काही काळ दिलासा मिळाला आहे. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी लोणावळ्यातील एका संस्थेला भेट दिल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून महामार्गालगतच्या पेरू विक्रेत्यांसह अन्य विक्रेत्यांच्या टपऱ्या हटविण्यात आल्या. रस्त्यांच्या कडेला असलेले अडथळे दूर झाल्याने वाहतुकीला काही प्रमाणात मोकळीक मिळाली. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या आणि वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या रस्त्यांवर काही काळ मोकळेपणाचे चित्र पाहायला मिळाले.
वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम
लोणावळा शहरात पर्यटन हंगाम, वाढती वाहनसंख्या आणि रस्त्यालगत होणारे अतिक्रमण यामुळे वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. याचा फटका स्थानिक नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना बसत आहे. रस्त्यांच्या कडेला उभ्या राहणाऱ्या हातगाड्या, टपऱ्या आणि अन्य अडथळ्यांमुळे वाहतुकीच्या प्रवाहावर परिणाम होत असल्याचे चित्र अनेकदा दिसून येते. अतिक्रमण हटविणे, वाहतूक नियोजन करणे आणि कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे. मात्र, नियमित कारवाई करण्याऐवजी व्हीआयपी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच रस्ते मोकळे आणि सुस्थितीत केले जात असल्याचे चित्र दिसल्याने नागरिकांकडून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
‘व्हीआयपींच्या दौऱ्यावेळीच आठवण होते का?’
‘व्हीआयपींच्या दौऱ्यावेळीच प्रशासनाला अतिक्रमण आणि रस्त्यांची आठवण होते का?’ असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यासाठी रस्ते तातडीने स्वच्छ आणि वाहतुकीसाठी मोकळे केले जात असतील, तर सर्वसामान्य नागरिकांसाठीही अशीच तत्परता नियमितपणे का दाखवली जात नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. व्हीआयपी मूव्हमेंटपुरते रस्ते मोकळे करण्याऐवजी शहरातील अतिक्रमणावर नियमित नियंत्रण ठेवणे, वाहतूक व्यवस्थेचे प्रभावी नियोजन करणे आणि रस्त्यांची वेळोवेळी देखभाल करणे आवश्यक आहे. पर्यटन शहर म्हणून लोणावळ्यात वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेता वाहतूक कोंडीवर तात्पुरत्या कारवाईऐवजी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे.
नियमित कारवाईची मागणी
व्हीआयपी दौऱ्याच्या निमित्ताने प्रशासनाची यंत्रणा वेगाने काम करू शकते, तर त्याच पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन समस्यांकडेही नियमितपणे लक्ष दिले जावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ‘व्हीआयपी मूव्हमेंट रोजच व्हावी’ अशी उपरोधिक अपेक्षा व्यक्त करण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये, यासाठी अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर नियमित व ठोस कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.






