
देहूत आषाढी वारीच्या तयारीचा आढावा; विभागीय आयुक्तांनी सुरक्षा, वाहतूक अन् सुविधांची केली तपासणी
देहूगाव : देहू ते पंढरपूर आषाढी एकादशी दरवर्षी प्रमाणे पालखी सोहळा दिनांक ७ जुलै प्रस्थान होत असल्याने श्रीक्षेत्र देहू येथे आगामी आषाढी वारी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त शितल तेली यांनी गुरुवारी (दि. ४) देहू येथे विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संयुक्त पाहणी दौरा केला. वारीदरम्यान भाविकांची होणारी मोठी गर्दी, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था आणि मूलभूत सुविधांच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या नियोजनाची यावेळी सविस्तर पाहणी करण्यात आली.
सकाळी सुमारे सव्वा नऊ वाजता जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात सुरू झालेल्या या पाहणी दौऱ्यात विभागीय आयुक्त शितल तेली यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर तसेच श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर कार्यालयात श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, विश्वस्त उमेश महाराज मोरे आणि विक्रमसिंह महाराज मोरे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, धीरज पाटील, विक्रांत देशमुख, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, तहसीलदार जयराज देशमुख, देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे, स्थापत्य अभियंता संघपाल गायकवाड, नगराध्यक्ष पूजा दिवटे, देहूरोड पोलीस ठाण्याचे लीस निरीक्षक विक्रम बनसोडे तसेच महसूल, पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी उपस्थित होते.
समन्वयाने काम करण्याचे निर्देश
पाहणीदरम्यान मंदिर परिसर, पालखी मार्ग, पार्किंग व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. संबंधित विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देत वारी सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पाडण्यासाठी परस्पर समन्वयाने काम करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सर्व आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला असून, वारीपूर्व तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदीत नियोजन बैठक
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि वारीचे नियोजन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी गुरुवारी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराला भेट देऊन संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत वारी व्यवस्थापन, भाविकांसाठी आवश्यक सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षा यंत्रणा तसेच विविध विभागांमधील समन्वय याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आषाढी वारी सुरक्षित, शिस्तबद्ध आणि निर्विघ्न वातावरणात पार पडावी, यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. वारीदरम्यान लाखो भाविक आळंदीत दाखल होत असल्याने त्यांच्या सोयीसुविधांबाबत विशेष दक्षता घेण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नियोजन, स्वच्छता व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी आणि सुरक्षा यंत्रणेची सज्जता यावर भर देण्यात आला. यावेळी आळंदी नगरपरिषद व आळंदी ग्रामस्थांच्या वतीने विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी आळंदी देवस्थानचे विश्वस्त मंडळ, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, सभागृह नेते सचिन गिलबिले, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील, नगरसेविका पूजा घुंडरे, नगरसेवक गोविंदा कुऱ्हाडे, कालिदास तापकीर तसेच विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.