पुणे : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांचा पुढील आठवड्यातील नियाेजित पुण्याचा दाैरा (Amit Shah Pune Visit) स्थगित झाला आहे. या दाैऱ्याची पुढील तारीख नंतर निश्चित केली जाणार आहे. तत्पूर्वी या दाैऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.
अमित शहा यांच्या नियोजित पुणे दौर्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आमने-सामने आले आहेत. शहा यांच्या दौर्यावरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जाऊ लागले आहेत. महापालिकेच्या विस्तारीत नवीन इमारतीच्या तळमजल्याच्या प्रवेशद्वारावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि रयतेचे राजे छत्रपती शिवरायांचे पुतळ्याचे भूमीपूजन अमित शहा यांच्या हस्ते 26 नोव्हेंबर रोजी करण्याचे नियोजन पालिकेतील सत्ताधारी भाजपने केले हाेते. तसेच महापालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेवून शहा यांच्या उपस्थितीमध्ये गणेश कला व क्रीडा मंच येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याचे नियोजन हाेते. परंतु हा दाैराच स्थगित केल्याची माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी कळविले आहे.
अमित शहा यांच्या पुणे दौर्यावरून शहरातील राजकारण तापत आहे. आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अमित शहा यांना भाजप शहरात आणत आहे. भाजपला पालिकेतील सत्ता जाण्याची भिती आहे. भाजपच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. त्यामुळे भाजप शहा यांना पुण्यात आणून मेळावा घेत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. अमित शहाच काय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जरी शहरात आणले तरी महापालिकेत आमचीच सत्ता येणार असल्याचा दावा जगताप यांनी केला आहे.
दरम्यान, महापालिका सभागृह नेते गणेश बिडकर यांनी जगताप यांच्या आरोपाला उत्तर देताना राष्ट्रवादीवर प्रतिवार केला आहे. प्रशांत जगताप यांची कीव येत असल्याचे त्यांनी नमूद केले. सरंजामदारी मानसिकता असलेल्या पक्षाला काही देणेघेणे नाही. राष्ट्रवादीत राहून जगताप यांची झेप फक्त सत्ता आणि निवडणूक यापुरतीच मर्यादित आहे. पायाखालची वाळू कोणाची सरकते आहे, हे मार्च 2022 मध्ये नक्कीच जगताप व राष्ट्रवादीला समजेल, असेही बिडकर यांनी नमूद केले आहे.