वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी भोरमध्ये अनोखं आंदोलन; आंदोलकांनी साष्टांग प्रमाण करत केलं...
भोर : भोर तालुका हा सह्याद्रीच्या डोंगर रांगानी व्यापलेला आहे. निसर्ग सौंदर्याच्या उधळनीचं देणं लाभलेला असला, तरी पर्यटन विकासाचा वणवा, दळणवळणाच्या सोयी-सुविधांचा अभाव असल्याने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या भाग म्हणून जिल्ह्यात ओळखला जातो. त्यातच विकासाच्या दृष्टीने महत्वाचा ठरणाऱ्या भोर-कापूरहोळ-वाई-सुरूर या रस्त्याचे काम सुरु झाले.
रस्त्याच्या रुंदीकरणावेळी रस्त्याच्या शेजारील दुतर्फा असलेल्या हजारो झाडांची कत्तल करण्यात आली. मात्र, रस्त्याचे काम झाल्यानंतर प्रशासनाने ठरल्याप्रमाणे त्या प्रमाणात वृक्ष लागवड केली नसल्याने संबंधित ठेकेदार, संबंधित विभागाला हलगर्जीपणाची जाणीव करून देण्यासाठी व कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी मंगळवारी (दि.१२) सकाळी ११ वाजता पर्यावरणप्रेमींनी भाटघर येथील वन परिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात साष्टांग प्रणाम आंदोलन केले.
रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अडथळा निर्माण होणाऱ्या हजारो वृक्षांची वृक्षतोड संबंधित प्रशासनाकडून करण्यात आली होती. सदर वृक्षतोड बदल्यात रस्त्यालगत सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराकडून तिपटीने वृक्ष लागवड करण्याचे सांगितले होते; परंतु वृक्ष लागवड सांगितल्या प्रमाणात न झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पर्यावरणमित्रांनी त्याबाबतचे लेखी निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभाग यांच्याकडे दिले होते. मात्र, संबंधित निवेदनात किती व कोणत्या प्रकारचे वृक्ष लागवड झाली?, अशा प्रकारची माहिती मागवली होती.
मात्र, ती माहिती संबंधित वेळेत प्राप्त न झाल्यामुळे व वेळकाढूपणाची भूमिका घेत असलेल्या विभागाला कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी भोरमधील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी भाटघर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर नाराजी व्यक्त करत साष्टांग प्रणाम आंदोलन केले.
वन विभागाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
सदर केलेले आंदोलन हे कापुरव्होळ भोर रस्त्याच्या दुतर्फा परवानगीने तोडलेल्या झाडांच्या बदल्यात तिप्पट झाडे लावण्याचा नियम असून, तिप्पट झाडे लावण्याबाबत कार्यकारी अभियंता सा.बा.(द) पुणे यांनी वृक्ष तोड परवानगी देताना बंधपत्र लिहुन दिले होते. त्यान्वये त्यांनी सदर तिप्पट वृक्ष लागवड केल्याबाबतचा अहवाल सादर करण्याबाबत त्यांना कळविले आहे. सदर तिप्पट झाडे लावण्याबाबत संबंधित यंत्रणेकडे या कार्यालयाकडून पत्रव्यवहार करुन पाठपुरावा करण्यात येत आहे.
संबंधित यंत्रणेकडून याबाबत माहिती घेऊन झालेल्या कार्यवाहीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपणास त्याबद्दल माहिती देण्यात येईल. तसेच संबंधित यंत्रणेने सदर तिप्पट वृक्ष लागवड न केल्यास संबंधितांवर उचित कारवाई करण्यात येईल. तसेच वृक्षतोड परवानगीची मुदत संपल्यानंतर तोडलेल्या व वाहतुक केलेल्या वृक्षांबाबत संबंधीत यंत्रणा व ठेकेदार यांच्यावर पुढील १० दिवसात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तरी आपले आंदोलन मागे घेण्यात यावे, असे लेखी आश्वासन वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.