सौजन्य - नवराष्ट्र टीम
सासवड : सोनोरी गावात लाखो रुपयांच्या विकासकामांचा डोंगर उभा केल्याचे राजकीय पटलावरून सांगितले जात असले तरी त्यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून कामे मात्र अत्यंत निकृष्ट होत असल्याचे समोर आले आहे. शाळेच्या दोन वर्ग खोल्या आणि दुरुस्तीच्या नावाखाली तब्बल एक कोटीचा चुराडा केल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. त्यानंतर आता केवळ २०० मीटर रस्त्याच्या कामासाठी तब्बल २० लाख रुपये खर्च करूनही खड्डे मात्र तसेच असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक आहेत.
सासवड सोनोरी रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून आले असून या कामांचा दर्जा न तपासता पैसे काढून देणाऱ्या अभियंत्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. सासवड सोनोरी या रस्त्यावरील ३ मीटर रुंदी आणि २०० मीटरची लांबी असलेल्या सिमेंट कॉन्क्रेटच्या कामासाठी तब्बल २० लाख रुपये आले असून ठेकेदाराने बांधकाम विभागाच्या अभियंत्याशी संगनमत करून काम न करताच पैसे काढल्याचा जोरदार आरोप केला आहे.
दोन्ही कामांचा ठेकेदार गावातीलच
शाळेचे काम मूळ ठेकेदार सुधीर कातोरे याने घेतले असून, बांधकाम गावातील पोट ठेकेदार नितीन काळे याच्याकडून करून घेतले आहे. त्याच पद्धतीने रस्त्याचे काम शिवरी येथील किरण कामथे या ठेकेदाराने घेतले, मात्र त्यांने स्वतः काम न करता पूर्वीचाच पोट ठेकेदार नितीन काळे यास काम दिले असून ३ मीटर रुंदी आणि २०० मीटर लांबीच्या कामासाठी २० लक्ष रुपये मिळाल्याचे पंचायत समितीचे बांधकाम उपअभियंता संतोष नलावडे यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे कामांचा दर्जा न तपासता पैसे वर्ग करून टक्केवारीतून मलिदा खाणारे अभियंता नलावडे हेच असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले असून त्यांचीच खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी आरपीआयचे (आठवले) तालुकाध्यक्ष बळीराम सोनवणे यांनी केली आहे.
फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी
जिल्हा नियोजन मधून पंचायत समितीच्या माध्यमातून २०० मीटरच्या रस्त्यासाठी २० लाख मंजूर आहेत. अद्याप रस्त्याच्या साईड पट्ट्या भरायच्या असून काही काम करायचे बाकी असल्याची माहिती पंचायत समितीचे बांधकाम उप अभियंता संतोष नलावडे यांनी दिली आहे. तर अधिकारी खोटे बोलत असून त्यांनी पूर्ण बिले काढली आहेत. त्यामुळे संतोष नलावडे यांची खातेनिहाय चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आरपीआयचे (आठवले) तालुकाध्यक्ष बळीराम सोनवणे यांनी केली आहे.






