Latur News: उदगीरमध्ये अनधिकृत सावकारीवर धाड; कोरे स्टॅम्प पेपर व धनादेश जप्त
या तक्रारींची दखल घेऊन सहाय्यक निबंधक बी. एस. नांदापूरकर यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके नियुक्त करण्यात आली होती. या पथकांनी शुक्रवारी (दि. २७) शहरातील चर्च रोड येथील रविप्रभा गणपत मोतेवाड व गणपत मोतेवाड यांच्या घराची झडती घेतली. तसेच निडबन येथील काशिनाथ विश्वनाथ सोमवंशी आणि शहरातील येणकी रोडवरील पिराजी बाबुराव बालुरे या तीन अनाधिकृत सावकारांच्या घरांची झडती घेण्यात आली. या कारवाईमध्ये सह्या असलेले कोरे स्टॅम्प पेपर, कोरे धनादेश व संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी महाराष्ट्र सावकारी नियमन कायद्यातील तरतुदीनुसार जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी व संबंधितांचे जबाब घेण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सहाय्यक निबंधक बी. एस.
नांदापूरकर यांनी सांगितले.
कारवाईसाठी नियुक्त तीन पथकांमध्ये सहकार अधिकारी एन. एस. शेख, आर. डी. ढगे, अश्विनी पुढेवाड, बी. एच. शिंदे, रुपेश संघई, गोविंद मुंडे, सी. एम. धोंडगे, एच. डी. शिवनेचारी, जीवन चोले, पराग देशमुख, यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी होते. उदगीर शहर व तालुक्यातील अनेक गावात अनाधिकृत सावकारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अवैध सावकारी व्यवसाय करणारे सावकार कर्जदारांकडून कोरे सह्या असलेले स्टॅम्प पेपर व कोरे धनादेश घेऊन ५ ते २० टक्के दराने व्याजाने पैसे देण्यात येत असल्याची चर्चा आहे. आडी अडचणी साठी कर्ज घेतलेल्या कर्जदारांकडून मोठ्या प्रमाणात व्याज वसूल केले जाते.
महाराष्ट्र शासनाने सन २०१४ मध्ये महाराष्ट्र सावकारी अधिनियम हा कायदा लागू केलेला आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार अवैध सावकारी सिद्ध झाल्यास ५ वर्षे कारावास व ५० हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. अवैध सावकारामुळे त्रस्त असलेल्या व्यक्तींनी कोणतेही टोकाचे पाऊल न उचलता संबंधिताविरुद्ध सावकाराचे सहाय्यक निबंधक तथा सहाय्यक निबंध सहकारी संस्था कार्यालयात रीतसर तक्रारी दाखल करावेत, असे आवाहन सहाय्यक निबंधक बी. एस. नांदापूरकर यांनी केले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सावकारी नियमन कायद्यातील तरतुदीनुसार जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी व संबंधितांचे जबाब घेण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सहाय्यक निबंधक बी. एस. नांदापूरकर यांनी सांगितले.






