(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
स्त्रीच्या स्वातंत्र्याचा आणि स्वाभिमानाचा प्रभावी संदेश देणाऱ्या ‘तिघी’ चित्रपटाच्या टीमने यंदाची होळी पुण्यातील ‘मातोश्री ओल्डएज होम’ येथे अर्थपूर्ण पद्धतीने साजरी केली. भारती आचरेकर, नेहा पेंडसे बायस, सोनाली कुलकर्णी आणि दिग्दर्शिका जिजीविषा काळे यांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत रंग, गाणी आणि आनंदाची उधळण करत होळीला सामाजिक संदेशाची जोड दिली.
चित्रपटात ज्येष्ठ, स्वाभिमानी आणि स्वतंत्र स्त्रीची भूमिका साकारणाऱ्या भारती आचरेकर यांच्या व्यक्तिरेखेने आधीच प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. उतारवयातही स्वावलंबन आणि आत्मसन्मान जपत जगण्याचा ठाम विचार ‘तिघी’मधून मांडण्यात आला आहे. ‘मातोश्री ओल्डएज होम’मधील ज्येष्ठ नागरिक स्वतःच्या खर्चाची जबाबदारी सांभाळत सन्मानाने जीवन जगत आहेत. यातून वृद्धाश्रम हा असहायतेचा नव्हे, तर स्वाभिमानाचा पर्याय असू शकतो, हा महत्त्वाचा संदेश अधोरेखित झाला केला गेला.
होळीच्या निमित्ताने सर्वांनी सात्विक आणि पर्यावरणपूरक रंगांत आनंद साजरा केला. गुलालाच्या हलक्या रंगांसोबत मनमोकळ्या गप्पा आणि गाण्यांनी वातावरण भारावून गेले. भारती आचरेकर यांनी यावेळी सांगितले की, वृद्धाश्रमाकडे केवळ सहानुभूतीने पाहण्याऐवजी तो स्वाभिमानाने घेतलेला निर्णय असू शकतो, हे येथे आल्यावर प्रकर्षाने जाणवले.
सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा चित्रपट ६ मार्च रोजी प्रदर्शित होत असून, निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. स्त्रीच्या आत्मसन्मानाचा आणि स्वातंत्र्याचा संदेश देणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी विचार करायला भाग पाडणारा ठरणार आहे.






