
Raigad News: उकाड्यामुळे ग्राहक घरातच; महाड बाजारपेठेतील वर्दळ घटली, व्यापारी चिंतेत
राज्यासह रायगड जिल्ह्यात सध्या उष्णतेचा पारा चढलेला असून महाडमध्येही सरासरी ३८ ते ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत आहे. त्यातच हवेतील आर्द्रतेचे वाढलेले प्रमाण नागरिकांसाठी अधिक त्रासदायक ठरत आहे. उकाड्यामुळे दुपारच्या वेळेत ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडणे टाळत असल्याचे दिसून येत आहे. सकाळी साधारणपणे ११ ते १२ वाजेपर्यंत शहरातील मुख्य बाजारपेठेत काही प्रमाणात ग्राहकांची वर्दळ दिसून येते, मात्र त्यानंतर बाजारपेठेतील हालचाली मंदावतात.
दरम्यान, वाढत्या महागाईचा परिणामही ग्राहकांच्या खरेदी क्षमतेवर होत असल्याचे दिसून येत आहे. मध्यपूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थिती तसेच जागतिक स्तरावरील आर्थिक घडामोडींची अप्रत्यक्ष झळही बाजार व्यवस्थेवर बसताना दिसत आहे. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतर खरेदीकडे ग्राहकांचा कल कमी झाल्याचे चित्र आहे.
सध्या लग्नसराईचा हंगाम आणि तोंडावर आलेला पावसाळा लक्षात घेता ग्रामीण भागातून किराणा तसेच इतर साहित्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत असते. मात्र यंदा या खरेदीमध्ये काहीशी मंदी जाणवत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. विशेषतः दुपारी एक ते चार या वेळेत महाड बाजारपेठेत तुरळक गर्दी दिसून येत असून काही ठिकाणी रस्त्यांवर अक्षरशः शुकशुकाट असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
महाडने यापूर्वी २०२१ मधील महापुराचा तडाखा तसेच कोरोना महामारीच्या काळातील आर्थिक संकटाचा सामना केला होता. त्या काळात व्यापारी, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रालाही मोठा फटको बसला होता, मात्र गेल्या चार वर्षांत व्यापा-यांनी व्यवसायात काही प्रमाणात स्थैर्य निर्माण केले होते. आता पुन्हा वाढत्या उष्णतेमुळे खरेदीत घट झाल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.