Chandrapur News: एसटी आगारातील वातावरण तापले; कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट, प्रवासी सेवांवर परिणाम होण्याची भीती
आगारातील काही अधिकारी कर्मचाऱ्यांशी कठोर आणि दबावाचे धोरण अवलंबत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. एखाद्या कर्मचाऱ्याची तब्येत बिघडल्यास किंवा वैद्यकीय कारणास्तव रजेचा अर्ज दिल्यास तो तातडीने मंजूर न करता संबंधित कर्मचाऱ्यांवर ‘कामावर हजर राहावेच लागेल’ असा दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे. काही कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करूनही सुटी नाकारण्यात आल्याचा आरोप केला. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ड्युटी नंबर वाटपामध्येही पारदर्शकता राहत नसल्याने नाराजी वाढत आहे. काही मोजक्या कर्मचाऱ्यांना सोयीचे नंबर व वेळापत्रक दिले जात असून, इतर कर्मचाऱ्यांना वारंवार गैरसोयीच्या फेऱ्या दिल्या जात असल्याचा आरोप आहे. या प्रक्रियेत आर्थिक देवाणघेवाण होत असल्याच्या चर्चामुळे वातावरण अधिकच तापले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
अधिकृतरित्या याबाबत कोणतीही पुष्टी नसली तरी आगार परिसरात या चर्चाना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, नुकतेच रुजू झालेले काही अधिकारी एसटी प्रशासनाला खाजगी संस्था समजून वागत असल्याचा आरोपही कर्मचारी वर्गातून होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांना दबावाखाली ठेवले जात असल्याने कर्मचारी मानसिक त्रास सहन करत असल्याची भावना व्यक्त होत आहे. ‘कर्मचाऱ्यांशी संवादाऐवजी आदेश आणि दवावाचे वातावरण निर्माण केले जात आहे,’ अशी माहिती काही कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
चंद्रपूर आगार हे जिल्ह्यातील महत्त्वाचे एसटी केंद्र मानले जाते. दररोज हजारो प्रवासी या आगारातून प्रवास करत असतात. अशा परिस्थितीत प्रशासनातील अंतर्गत तणाव आणि कर्मचारी असंतोष वाढल्यास त्याचा थेट परिणाम प्रवासी सेवांवर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. कर्मचारी वर्गाकडून प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, दोषींवर कारवाई करावी आणि कामकाजात पारदर्शकता आणावी, अशी मागणी केली. अन्यथा येत्या काही दिवसांत आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
फलटणच्या श्रीराम कारखान्याबाबत मोठा निर्णय; जवाहर कारखान्यासोबतचा करार रद्द होणार? 18 मे रोजी फैसला
सद्या लग्न सराईचे दिवस आहे. त्यामुळे बसची बुकिंग असते. लोकाना गाड्या द्याव्या लागतात. याशिवाय उन्हाळ्यात बस फेऱ्याची वाढ होते. चालक व वाहकाचा रजा कोटा असतो. त्यानुसार सुट्या दिल्या जातात. त्या कोटयापेक्षा जास्त रजा दिल्यातर बस फेऱ्यांचे नियोजन बिघडते. त्यांनी आपले कर्तव्य समजून घेतले पाहिजे. सर्वांना सुटी दिल्यातर प्रवाश्यांच्या सेवेचे काय? कर्मचाऱ्यांच्या तक्रारीत तथ्य नाही.- छगन दिवसे, विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ, चंद्रपूर.






