
Raigad News: आधी अतिवृष्टी, नंतर पावसाची दडी! माणगावमध्ये भातशेतीला दुहेरी फटका, दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
माणगाव: यंदाच्या हंगामात पावसाच्या अनियमिततेचा मोठा फटका माणगाव तालुक्यातील भातशेतीला बसला आहे. सुरुवातीला पावसाच्या अनिश्चिततेमुळे पेरणीला झालेला विलंब, त्यानंतरची अतिवृष्टी आणि भाताचे पीक परिपक्व होण्याच्या काळात पडलेल्या पावसाच्या खंडामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तालुक्यातील जवळपास ७० टक्के शेतीचे नुकसान झाल्याचा दावा शेतकरी वर्गातून करण्यात येत असून, माणगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
यंदा हंगामाच्या सुरुवातीला पाऊस वेळेवर पडेल की नाही, तसेच एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहील की काय ? या चिंतेने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी लांबणीवर टाकली. त्यानंतर काही काळ अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी भाताची रोपवाटिका अर्थात तरवे पाण्याखाली गेले. काही शेतकऱ्यांना अपेक्षित रोपे तयार करता आली नाहीत. परिणामी, वेळेवर भातलागवड करण्याचे नियोजन विस्कळीत झाले. लागवडीच्या काळात काही प्रमाणात समाधानकारक पाऊस झाल्याने उपलब्ध रोपांच्या आधारे उखाड पद्धतीने लागवड करावी लागली. त्यामुळे पिकाच्या वाढीवर आणि अपेक्षित उत्पादनावर परिणाम झाला. (फोटो सौजन्य – AI Created)
भाताच्या पिकाला दाणे भरण्याच्या आणि पक्व होण्याच्या महत्त्वाच्या टप्यावर पावसाने अचानक दडी मारली. जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे भाताचे दाणे पूर्णपणे भरू शकले नाहीत. अनेक ठिकाणी दाणे अर्धवट राहिल्याने भात पोचट झाला असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला अतिवृष्टी आणि नंतर पावसाचा खंड अशा दुहेरी संकटामुळे शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
काही भागांत भाताची पिके चांगली दिसत असली, तरी शेतातील वास्तव पूर्णपणे वेगळे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे; तालुक्यातील सुमारे ७० टक्के शेतजमिनीचे नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांच्या उत्पादनावर याचा गंभीर परिणाम झाला आहे, असा दावा केला जात आहे. त्यामुळे गावनिहाय पीकस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणे आवश्यक आहे.
यावर्षीचे दुष्काळाचे संकट वेगळ्या प्रकारचे असून जवळपास ७० टक्के शेती नुकसानग्रस्त झाली आहे. शेतामध्ये जे काही थोडेफार पीक आहे त्यावर सुद्धा अति उष्णता व पावसाचे संकट आहे. यापुढे भात शेती तयार होऊ शकत नाही. त्यामुळे माणगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा. ज्यामुळे पुढील हंगामात शेती करायला थोडीफार आर्थिक मदत होईल. बी बियाणे, खते इत्यादींचा पुरवठा होऊन भविष्यात शेतकरी बोडीफार उभारी घेऊ शकेल. – संदीप खडतर, प्रगत शेतकरी, चेरवली.