Raigad News: माणगावकरांच्या नळाला गढूळ पाणी! नागरिक नाराज, नगरपंचायतीकडून तातडीच्या सूचना
Chandrapur News: चंद्रपुरात वाघाची दहशत! महिनाभरात 3 गुराख्यांचा बळी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
याबाबत संबंधित पाणीपुरवठा कर्मचारीवर्गाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या काळनदी तसेच आजूबाजूच्या डोंगर परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने काळनदीचे पाणी तांबडेलाल, चिखलमिश्रित झाले आहे. हे मातीमिश्रित पाणी जॅकवेलमधून उपसा पंपाद्वारे थेट उतेखोल येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. त्यानंतर तुरटी व टीसीएल पावडरचा योग्य वापर करून फिल्टरेशन प्लांटमधील टाक्यांद्वारे पाण्याची शुद्धीकरण प्रक्रिया केली जाते. (फोटो सौजन्य – AI Created)
सध्या अधूनमधून होणारा जोरदार पाऊस आणि त्यामुळे काळनदीच्या पाण्याचा बदललेला रंग यामुळे शुद्धीकरण प्रक्रिया करूनही काही वेळा नळाला गढूळ पाणी येत असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी सध्या पाण्याचा साठा करून तो गाळून व उकळूनच पिण्यासाठी वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शुद्धीकरणानतर पाणी येथील तीन मोठ्या साठवण टाक्यांमध्ये आणले जाते. त्यानंतर नऊ पाइपलाइनद्वारे तीन पाळ्यामध्ये दिवसभर नळ कनेक्शनला पाणीपुरवठा केला जातो. माणगावकरांना दररोज जवळपास ३५ लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने अधूनमधून उद्भवणारे तांत्रिक अडथळे तसेच विजेचा खंडित किंवा कमी-जास्त दाबाचा पुरवठा यामुळे पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकावर परिणाम होतो.
या सर्व अडचणीवर मात करीत माणगावकरांना नियमित पाणीपुरवठा करण्याचे काम नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाकडून सुरू आहे. विशेषतः पावसाळ्यात तसेच उन्हाळ्याच्या अखेरीस नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेत होणाऱ्या बदलांमुळे नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कर्मचारीवर्गाला मोठी कसरत करावी लागते.
मातीमिश्रित गढूळ पाण्याच्या समस्येबाबत माणगाव नगरपंचायत पाणीपुरवठा सभापती अजित चंद्रकात तार्लेकर यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी संबंधित पाणीपुरवठा कर्मचारीवर्गाची नगरपंचायत कनिष्ठ अभियंता आकाश बुवा यांच्या उपस्थितीत उतेखोल जलशुद्धीकरण केंद्रात बुधवार दि. २३ सप्टेंबर रोजी तातडीची विशेष बैठक घेतली असल्याचे सांगितले.
या बैठकीत पाणीशुद्धीकरण प्रक्रियेत आवश्यक ती विशेष काळजी घेऊनच नागरिकांना पाणीपुरवठा करण्याच्या सूचना कर्मचारीवर्गाला देण्यात आल्या. तसेच कनिष्ठ अभियंता आकाश बुवा यांनी पाणीशुद्धीकरण प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी कर्मचारीवर्गाला आश्वस्त करून, शुद्धीकरण प्रक्रियेत अधिक दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.






