फोटो सौजन्य- प्रतिनिधी
माणगांव- सुनील राजभर: सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून माणगांव रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात आले. या कामाचा लोकार्पण सोहोळा दि. १५ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, महिला बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड यांच्या ऑनलाइन उपस्थितीत पार पडला.
यावेळी माणगाव नगरपंचायत नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, उपनगराध्यक्षा हर्षदा सोंडकर, कार्यकारी अभियंता महेश नामदे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष निलेश थोरे, तहसीलदार दशरथ काळे, उपविभागीय अभियंता विजय बागुल, भाजप तालुकाध्यक्ष गोविंद कासार, रा. कॉ. तालुकाध्यक्ष काका नवगणे, रा. कॉ. महिला तालुकाध्यक्ष संगिता बक्कम, शहर अध्यक्षा योगीता चव्हाण, नगर पंचायत मुख्याधिकारी संतोष माळी, रिक्षा युनियन अध्यक्ष संजय (अण्णा) साबळे, व्यापारी संघटना अध्यक्ष रमेश जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, उपअभियंता श्रीकांत गणगणे व रोहा आणि माणगावचे सर्व सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
माणगांव रेल्वे स्थानकांवर जास्तीत जास्त रेल्वेना थांबा देण्यासाठी प्रयत्न करू
यावेळी ना. आदिती तटकरे यांनी ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. महायुती सरकार मार्फत कोकणातील सर्व बस स्थानके, रेल्वे स्थानक यांचा कायापालट करण्यात आला आहे. सर्व सुख सुविधांयुक्त रेल्वे स्थानक सुशोभीकरण करण्यात आले आहेत. माणगांव बस स्थानक सुशोभीकरण सुद्धा काम सुद्धा लवकरच सुरू करण्यात येईल. तसेच माणगांव रेल्वे स्थानकांवर जास्तीत जास्त रेल्वेना थांबा देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन देखील यावेळी ना. तटकरे यांनी दिले.
राज्य शासनाने मार्च 2023 च्या अर्थसंकल्पामध्ये कोकणातील 12 रेल्वेस्थानकांच्या कामाकरिता 56 कोटीहून अधिक रुपयांची तरतूद केली होती. या 12 स्थानकांमध्ये रायगड जिल्ह्यामधील तीन रेल्वे स्थानके वीर, माणगाव आणि कोलाड तर रत्नागिरी जिल्ह्यातील पाच रेल्वे स्थानके खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी आणि राजापूर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार रेल्वे स्थानके त्यात सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्गनगरी, आणि कणकवली यांचा समावेश होता. यामुळे कोकणातील ही स्थानके आकर्षक आणि सुखसोईने सुसज्ज करण्याचा सरकारचा मानस आहे. अनेक स्थानकांचे लोकार्पणही करण्यात आले आहे.