नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस
नेरळ ग्रामपंचायत संबंधित आणि सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्यासंबंधीत विषय मार्गी लागावेत,नेरळ ग्रामपंचायत मधील ग्रामपंचायत अधिकारी, प्रशासक यांच्या कारभाराची चौकशी व्हावी,नेरळ नगरपरिषद व्हावी आदी मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते गोरख शेप यांनी 28 सप्टेंबर पासून नेरळ गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सुरू केले आहे.तीन दिवसांच्या उपोषण काळात त्यांच्या 13 मागण्यापैकी एकही मागणी पूर्ण झाली नाही.
त्यानंतर आम्ही नेरळकर म्हणुन नेरळ बाजारपेठ बंद ठेवण्यात यावे असे आवाहन असंख्य तरुणांनी बाजारपेठ मध्ये फिरून केले. त्यानंतर उपोषणाच्या चौथ्या दिवशी नेरळ बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यानुसार आज सकाळ पासून नेरळ गावातील बाजारपेठ बंद दिसून आली.
नेरळ मधील व्यापाऱ्यांनी फेरीवाले आणि फुटपाथ वर बसून व्यवसाय करणारे या सर्वांनी आवाहनानुसार नेरळ बंद ठेवले आहे.या उपोषणचे निमित्ताने नेरळ बंद चे आवाहन करणारे कोणतेही पत्र पोलीस ठाणे यांच्याकडे दिले नसल्याची माहिती पोलीस ठाण्याकडून मिळत आहे. परंतु आपल्या गावातील प्रश्न सोडवण्यासाठी उपोषण सुरू असल्याने नेरळ बाजारपेठ बंद ठेवून पाठिंबा दिल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान,मध्यरात्री नंतर उपोषणकर्ते शेप यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने शेवटी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी इसीजी काढून हृदयरोग रुग्ण असलेल्या उपसोहनकर्त्याची आरोग्य तपासणी केली.दुसरीकडे आरोग्य विभागाचे वतीने नेरळ पोलिस आणि प्रशासन यांनी बायपास शस्त्रक्रिया झालेले उपोषणकर्ते गोरख शेप यांच्यावर रुग्णालयात दाखल करून कार्डीओलॉजिस्ट यांच्या देखरेखीत उपचार व्हावेत अशी सूचना करण्यात आली आहे.त्यामुळे आज चौथ्या दिवसानंतर उपोषण कायम राहिल्यास प्रशासन उपोषणकर्त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता नाकारता येणार नाही.






