फोटो सौजन्य - सोशल मीडिया
पेण (विजय मोकल) :- शेकापचे उमेदवार अतुल म्हात्रे ग्रामीण भागात जनतेकडून पाठींबा मिळत आहे. जनतेकडून मिळत असणाऱ्या पाठिंब्यामुळे माझे मनोधैर्य वाढले आहे. आगामी निवडणुकीत जनतेच्या या ताकदीमूळे आपला विजय नक्कीच आहे. या विधानसभेत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पायाभूत सुविधांचा अभाव आहे. पाण्याच्या असुविधा वाड्यावस्त्यांवर आहेत. या पायाभूत सुविधा आपल्याला समाधान करायचे आहेत. रोजगाराची प्रचंड समस्या आहे ती सोडवायची आहे. रोजगारावर विशेष काम करण्याचे अभिवचन जनतेला देतो. तिसऱ्या मुंबईच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक हा विकासाच्या प्रक्रियेत केंद्रबिंदू असला पाहिजे. या संपूर्ण विधान परिषद मतदार संघाचा कायापालट करण्याचे अभिवाचन देतो.” असे वक्तव्य शेकापचे उमेदवार अतुल म्हात्रे यांनी बोलताना सांगितले.
अतुल म्हात्रे हे १९१ ,पेण विधानसभा निवडणुकीसाठी शेकापचे उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांना गावोगावी चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकांशी अतुल म्हात्रे हे संवाद साधत आहेत. अनेक जण विश्वासाने स्वत:हून त्यांना भेटत आहेत, समस्या मांडत आहेत तसेच त्यांना समर्थन ही देत आहेत. अतुल म्हात्रे यांच्यासह सुरेश खैरे, महादेव दिवेकर, किसनराव म्हसकर, शिवराम महाबले, ऍड रोशन पाटील, निखिल पाटील, प्रल्हाद पाटील, दीपक पाटील, देवेंद्र पाटील, महेंद्र ठाकुर, निलेश म्हात्रे, राजन झेमसे, प्रवीण पाटील यांच्यासह शेकाप कार्यकर्ते प्रचार करीत आहेत.
पेण विधानसभा मतदारसंघाचा इतिहास
पेण विधानसभेमध्ये अनेक दशकांपासून शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व होते. 1967 मध्ये पहिल्यांदा इथे ए.पी. शेट्ये यांनी शेकापचा झेंडा फडकवला. त्यानंतर 1980 ते 1999 अशा सलग पाच विधानसभा निवडणुकीत शेकापचे मनोहर पाटील या मतदारसंघातून आमदार झाले. 2004 मध्ये हा मतदारसंघ कॉंग्रेसने जिंकला 2009 पुन्हा धैर्यशील पाटील यांनी मतदारसंघात विजय मिळवत शेकापचे पेणमध्ये पुनरागमन केले. 2014 मध्येही धैर्यशील पाटील यांना जनतेने निवडून दिले. 2019 मध्ये मात्र इथे रवीशेठ पाटील यांनी विजय मिळवला विधानसभेच्या इतिहास पहिल्यांदाच हा मतदारसंघ भाजपने जिंकला होता. 2019 च्या निवडणूकीत 24 हजारहून जास्त मताधिक्क्याने ते निवडून आले होते. विद्यमान आमदार रवीशेठ पाटील हे 2004 मध्ये कॉंग्रेसकडून या मतदारसंघाचे आमदार झाले होते.
अतुल म्हात्रे यांना मिळणारा वाढता पाठिंबा शेकापसाठी महत्वाचा
यावेळी शेकाप पक्षाने अतुल म्हात्रे यांना संधी दिल्याने पेण मधील निवडणूक ही चुरशीची होणार आहे. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असल्याने येथे भाजप, शेकाप, शिवसेना ठाकरे गट अशी तिरंगी लढत होणार आहे. अतुल म्हात्रे यांना मतदारसंघात मिळणारा वाढता पाठिंबा हा शेकापसाठी या मतदारसंघात पुन्हा विजय मिळवून देण्यासाठी महत्वाचा ठरु शकतो.