फोटो सौजन्य- प्रतिनिधी
महाविकास आघाडीने शेतकरी कामगार पक्षाला अलिबाग, पनवेल आणि पेण या तीन जागा सोडल्याने या तिन्ही जागांवरील त्यांचे उमेदवार माघार घेतील, असे संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं. अलिबाग मधून ठाकरे पक्षाकडून जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दि.२८ ऑक्टोंबर रोजी ए.बी फॉर्म सुपूर्द केला व म्हात्रे यांना निवडणूक लढण्याचे आदेश दिले.
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचा ठाम विश्वास ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. मागील चार दिवसांपासून ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते उमेदवारांच्या संपर्कात असून त्यात त्यांना यश आल्याने हे उमेदवार त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतील. हे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होईल, असंही संजय राऊत म्हणाले.
यावेळी म्हात्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, मी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला होता, दाखल केलेला अर्ज महाविकास विकास आघाडी तर्फे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. परंतु आज महाविकास आघाडीची बैठक झाली त्यात ठरल्यानंतर मला पक्षप्रमुखांनी फोन केला व अर्ज मागे घेण्यास सांगितले, ज्यांनी मला बोलावून अर्ज भरायला सांगितला, त्यांनीच अर्ज मागे घ्यायला सांगितला म्हणून मी अर्ज मागे घेतलाय, पुढील असणारा मातोश्रीचा आदेश मला मान्य असेल, आम्ही पक्षात आलो मूळ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनीच त्यामुळे त्यांचा जो विचार आहे तो आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. जो मातोश्री व पक्षप्रमुखांचा आदेश असेल तोच सर्व कार्यकर्त्यांचे असेल, व त्यांनाच ठाकरे पक्षाचा पाठिंबा असेल.
अलिबाग विधानसभा
अलिबाग विधानसभा मतदारसंघ हा अनेक दशकांपासूनच शेतकरी कामगार पक्षाचा गड राहिला आहे. या मतदारसंघातून शेकापच्या दत्तात्रय पाटील यांनी 5 वेळा प्रतिनिधित्व केले आहे. तसेच शेकापच्या नेत्या मीनाक्षी पाटील या तीनवेळा अलिबागमधून निवडून आल्या आहेत. 2014 साली शेकापचे सुभाष पाटील निवडून आले होते. 2019 मध्ये पहिल्यांचा शिवसेनेने शेकापचा बालेकिल्ला उद्धवस्त करत पहिल्यांदाच विजय मिळवला होता. येथून शिवसेनेचे महेंद्र दळवी आमदार झाले.
2022 मध्ये शिवसेना फुटीत आमदार महेंद्र दळवी हे शिंदे गटासोबत राहिले. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी उभे केले आहे. त्यांच्याविरोधात शेकापच्या चित्रलेखा पाटील निवडणूक लढवत आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून सुरेंद्र म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतल्याने आता या मतदारसंघात शिवसेना शिंदे गट विरुद्ध शेकाप असा थेट सामना असणार आहे.