पनवेल ग्रामीण ( वा ) महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला अलिबाग, पेण आणि पनवेल मधील जागा सोडण्यात आल्याची घोषणा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.त्या बदल्यात उबाठा गटाच्या उमेदवारां विरोधात शेकाप ने उभे केलेले उमेदवार आपली उमेदवारी मागे घेतील अशी घोषणा करून सुद्धा उरण विधानसभा क्षेत्रात शेकापतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रीतम म्हात्रे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली नसून,पनवेल विधानसभा क्षेत्रातून उबाठा गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी नगरसेविका लीना गरड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने महाविकास आघाडीतील तिढा कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या साठी निवडणूक आयोगाच्या निर्देशनुसा उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. अर्ज मागे घेण्याच्या 4 नोव्हेंबर या शेवटच्या दिवशी पनवेल विधानसभा क्षेत्रातील 2 तर उरण विधानसभा क्षेत्रातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असले तरी महाविकास आघाडीने घोषित केल्या प्रमाणे पनवेल विधानसभा क्षेत्रातून उबाठा गटाने तसेच उरण विधानसभा क्षेत्रातून शेकापच्या उमेदवाराने निवडणूक रिंगणातून माघार घेतली नसल्याने निवडणुकीतील सस्पेन्स कायम आहे.
पनवेल मतदारसंघ
पनवेल मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर निवडणूकीच्या रिंगणात आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून लीना गरड यांनी उमेदवारी दाखल केली आहे. शेकाप कडून माजी आमदार बाळाराम पाटील उमेदवार आहेत. लीना गरड यांनी उमेदवारी मागे न घेतल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघातून 2009 पासून प्रशांत ठाकूर हे सलग तीन वेळा निवडून आले आहेत. 2009 मध्ये कॉंग्रेसकडून तर 2014 आणि 2019 मधून त्यांनी भाजपकडून विजय मिळवला आहे. त्यामुळे ठाकूर कुटुंबियांचा हा मतदारसंघ गड मानला जातो. त्यामुळे भाजपचे पारडे यावेळीही जड असल्याचे दिसते आहे.
उरण मतदारसंघ
महाविकास आघाडीकडून नेमका कोणता पक्ष या मतदारसंघातून लढणार हा तिढा आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सुटला नसल्याने उरण मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. सध्याचे विद्यमान आमदार महेश बालदी हे भाजपचे उमेदवार आहेत. तर शिवसेना उबाठाचे माजी आमदार मनोहर भोईर आणि शेकापचे प्रितम म्हात्रे यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने ही लढत होणार आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या पक्षांमधील मैत्रीपूर्ण लढतीमुळे मतविभाजनाचा त्यांना तोटा होण्याची शक्यता जास्त आहे.
या मतदारसंघात होऊ घातलेल्या तिरंगी लढतीमुळे येथे चुरशीची लढत होणार हे नक्की, आता मतदारराजा कोणत्या पक्षाला कौल देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.