Raigad News: जवानांच्या चेहऱ्यावर फुलणार हास्य! पनवेलमधून सीमेवर जाणार १८ हजार फराळाचे बॉक्स
मागील वर्षी १६ हजार ५०० जवानांपर्यंत फराळ पोहोचवण्यात आला होता. यंदा या उपक्रमाचा विस्तार करून १८ हजार फराळाचे बॉक्स तयार केले जात आहेत. प्रत्येक बॉक्समध्ये चार ड्रायफ्रूट लाडू, चार चकल्या, १२५ ग्रॅम चिवडा आणि शंकरपाळी यांचा समावेश आहे. फराळ सुरक्षितपणे जवानांपर्यंत पोहोचावा, यासाठी प्रत्येकी २० बॉक्स एका मोठ्या मास्टर बॉक्समध्ये पॅक केले जात आहेत. (फोटो सौजन्य – AI Created)
अरुणाचल प्रदेशातील तवांग तसेच लेह, लडाख आणि सियाचीन येथील दुर्गम भागांत तैनात असलेल्या जवानांपर्यंत हा फराळ पोहोचवण्यात येणार आहे. अतिउंचीवरील आणि प्रतिकूल हवामानात कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी टिकाऊ फराळाचे पेंकिग काळजीपूर्वक केले जात आहे.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे फराळासोबत जवानांना हस्तलिखित शुभेच्छापत्रेही पाठवली जाणार आहेत. शाळकरी मुले, महिला आणि नागरिकांनी मराठी व हिंदी भाषेत जवानांसाठी शुभेच्छा संदेश लिहिले आहेत. काही पत्रांमध्ये कविता आणि भावनिक संदेशांचाही समावेश आहे. सीमेवर तैनात असलेल्या जवानांना दिवाळीच्या शुभेच्छांसोबत आपुलकीचा संदेश पोहोचवण्याचा यामागील उद्देश आहे.
“सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानाप्रति सद्भावना व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबवला जातो. फराळ मिळाल्यानंतर जवानांना होणारा आनंद ते छायाचित्रे, व्हिडिओ आणि पत्रांद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवतात. त्यातून स्वयंसेवकांनाही पुढील वर्षी अधिक व्यापक स्वरूपात उपक्रम राबवण्याची प्रेरणा मिळते,” असे भारत विकास परिषदेच्या कोकण, मुंबई व गोवा महिला विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी डॉ. कीर्ती समुद्रा यांनी सांगितले.






