ऐन मार्चअखेरीस नागपुरात पावसाची हजेरी; 1 एप्रिलपर्यंत ढगाळ-उन्हाळी वातावरण कायम
नागपूर : शहरातील वाढत्या तापमानाला पुन्हा ब्रेक लागण्याची चिन्हे दिसत आहेत. हवामानाचा अंदाज पुन्हा बदलत आहे. गुरूवारी रात्री उशिरा शहरात काही ठिकाणी पावसाने पुन्हा हजेरी लावली. बऱ्याच भागांत तुरळक पाऊस झाला. २७ मार्च रोजीही शहरात ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली.
गुरुवारी शहरातील हवामान मिश्र स्वरूपाचे राहिले. सकाळी काही काळ ढगाळ वातावरण होते. नंतर उन्हाचा तडाखा जाणवला. हवामान विभागाच्या नोंदीनुसार, शहराचे कमाल तापमान ३८.८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२.० अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ३० मार्च रोजी शहरासह जिल्हा आणि विदर्भातील अनेक भागांत दिवसभर ढगाळ वातावरण राहून हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळू शकतात. काही भागांत तुरळक गारा पडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. ३१ मार्च आणि १ एप्रिलदरम्यानही अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचे संकेत दिले आहे. या काळात कमाल तापमान ३७ ते ३९ अंश तर किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
हेदेखील वाचा : हज यात्रेकरूंसाठी गुड न्यूज! नवी मुंबईत मिळणार जागतिक दर्जाच्या सुविधा आणि प्रशिक्षण
विदर्भात ३० व ३१ मार्चदरम्यान पावसासह गारा पडण्याची शक्यता लक्षात घेता कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रब्बी हंगामातील पिके काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत किंवा साठवण केलेल्या धान्य व उत्पादनांवर आच्छादन करावे, असे सूचविले आहे. संभाव्य पावसामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी वेळेवर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे विभागाने नमूद केले आहे.
मुंबई आणि एमएमआर प्रदेशात उष्णतेची लाट सुरूच
मुंबई आणि एमएमआर प्रदेशात उष्णतेची लाट सुरूच आहे. सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे लोक उष्णतेच्या लाटेने त्रस्त आहेत. मुंबईत ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तीव्र उष्णतेने मुंबई आणि एमएमआर प्रदेशाला वेढले आहे. हवामान खात्याच्या मते, उपनगरांमध्ये दिवसाचे तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते, जे सामान्य तापमानापेक्षा ७.६ अंश जास्त होते. १९५६ पासून मुंबईत फक्त सहा वेळा ४० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक कमाल तापमान नोंदवले गेले आहे.






