गतवर्षी कमी कालावधीत पडलेला पाउस व सध्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या उन्हाच्या झळा यामुळे भुगर्भातील पाण्याच्या पातळीत कमालीची घट होत आहे. राजापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कोदवली येथील इंग्रज कालीन साहेबाच्या धरणातील पाणीसाठा कमालीचा कमी झाला आहे. परिणामी राजापूर वासियांवर यावर्षी मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाईचे संकट ओढवण्याचे चित्र दिसत आहे.
पावसाळ्यात पाणीच पाणी मात्र उन्हाळ्यात पाणी बाणी अशी राजापूरची दरवर्षी अवस्था असते. राजापूर शहरातून कोदवली व अर्जुना या दोन नद्या वाहत असल्या तरी दरवर्षी राजापूरकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. शहरवासीयांना पाणी पुरवठा करण्यासाठी राजापूर नगरपरिषदेला टंचाई काळामध्ये शीळ जॅकवेलवरुन पाणी पंपाद्वारे खेचावे लागते, त्यातच वीज सातत्याने खंडीत होत असल्याने शीळ जॅकवेलवरुन पाणी खेचण्यात नगर परिषदेलाही अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी शीळ जॅकवेलवर जनरेटर बसवावा लागतो. या जनरेटरच्या भाड्यापोटी दरवर्षी लाखो रुपयेही खर्च करावे लागतात. मात्र तरीही पाणी टंचाइचे संकट कायम राहते.
सध्या क वर्गात असणाऱ्या राजापूर नगरपरिषदेला पाणी पुरवठ्यावर दरवर्षी ९२ लाख ४० हजार रुपये खर्च करावे लागतात. पण पाणी पट्टीच्या करातुन राजापूर नगर परिषदेला केवळ ३० लाख ६१ हजार ८०० रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यामुळे सायबाच्या धरणातील पाणीसाठा संपला कि शहरवासीयांना पाणी पुरवठा करताना राजापूर नगर परिषदेच्या नाकी नउ येतात.
इंग्रजकालीन साहेबाच्या धरणाच्या खालच्या बाजुला राजापूर नगरपरिषदेने आजपर्यंत १० कोटी ७० लाख रुपये खर्च करुन नवीन धरणाचे काम करण्यात आले आहे. मात्र निधी कमी पडल्याने सदर नवीन धरण अद्यापही अपुर्ण अवस्थेत आहे. हे नवीन धरण पुर्ण करण्यासाठी अजुन ८ कोटी रुपयांची गरज असल्याचे नगर परिषद प्रशासनाने पत्रकारांशी बोलताना सांगितले. या नवीन धरणाचे काम अपुर्ण अवस्थेत असल्याने या धरणात पाणीसाठा होत नसुन सद्यस्थितीत राजापूर नगरपरिषदेला जुन्या इंग्रजकालीन साहेबाच्या धरणावरच पाणी पुरवठ्यासाठी अवलंबुन राहावे लागत आहे. त्यातच आता साहेबाच्या धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस खालावत असल्याने यावर्षी राजापूरकराना मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.