राजू शेट्टी यांनी आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्यावर कैद्यांना दिवाळी फराळामध्ये घोटाळा केला असल्याचा आरोप केला (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर आयजी जालिंदर सुपेकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. वैष्णवी हगवणे हिचा नवरा शशांक हगवणे याचा मामा असलेला जालिंदर सुपेकर यांच्याबाबत रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. जालिंदर सुपेकर यांनी कैद्यांना 550 कोटी रुपये मागितले असल्याचा मोठा दावा देखील वकिलांनी केला आहे. यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
जालिंदर सुपेकर हे सध्या कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत. तत्पुर्वी कारागृह विभागात कारागृह उप महानिरीक्षक ही राज्यात पाच पदे आहेत. दोन ठिकाणी अधिकाऱ्यांची नेमणूक आहे. तर नाशिक विभाग, संभाजीनगर आणि नागपूर कारागृह येथील कारागृह उप महानिरीक्षक पद रिक्त आहेत. त्यामुळे त्याचा अतिरीक्त कार्यभार सुपेकर यांच्याकडे देण्यात आलेला होता. आता त्यांचा अतिरिक्त भार काढून घेण्यात आला असला तरी कैद्यांना दिवाळीचा फराळ देताना घोटाळा केला असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राजू शेट्टी यांनी जालिंदर सुपेकर यांच्या दिवाळीमधील फराळावर देखील वाढीव शुल्क लावल्याचा गंभीर आरोप केला आहे. राजू शेट्टी यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “दिवाळी फराळ म्हणून कैद्यांना अमिताभ गुप्ता व जालिंदर सुपेकर यांनी १२०० रूपये किलोची काजूकतली खायला घातली मात्र कैद्यांनी ती खाल्लीच नाही ……!,” असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे.
४० ते ६० टक्के तफावत
पुढे त्यांनी लिहिले आहे की, “राज्यातील कारागृहात कैद्यांच्या नावाखाली बड्या अधिका-यांनी रेशन व कॅन्टीन साहित्य खरेदीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्ट्राचार केला आहे. कारागृह विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी कैद्यांना दिवाळीमध्ये जे फराळाचे साहित्य दिले त्या फराळाच्या साहित्याचे दर हल्दीराम ,काका हलवाई व चितळे बंधू यांच्या दर पत्रकाप्रमाणे होते. प्रत्यक्षात कैद्यांना लोकल मार्केटमधील फराळ खरेदी करून देण्यात आला या दरामध्ये जवळपास ४० ते ६० टक्के तफावत होती,” असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “गत दिवाळीत राज्यामध्ये जवळपास ५ कोटी रूपयाची खरेदी करण्यात आली आहे. सदरची खरेदी करण्यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया करण्यात आली नाही. सोबत फराळाचे साहित्य व त्याचे दरपत्रक टाकले आहे यावरून कारागृहात किती अनागोंदी कारभार चाललेला आहे हे लक्षात येईल,” अशा शब्दांत राजू शेट्टी यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता राजू शेट्टी यांनी आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्यावर मोठ्या घोटाळ्याचा आरोप केला आहे.