संजय शिरसाट यांची पत्रकार परिषद (फोटो -सोशल मिडिया)
छत्रपती संभाजीनगर: आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनीं ऑपरेशन टायगर, सामनावरील नाराजी, दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येण्यावर भाष्य केले आहे.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते. यावेळी शिरसाट म्हणाले, ” सामनामध्ये जे काही लिहिले आहे, त्याचा अर्थ सर्व काही उलट होणार असा आहे. गेल्या अडीच वर्षात सामनामध्ये लिहिलेले खरे झाले हे दाखवून द्यावे. त्यामुळे शुभ बोल रे नाऱ्या असे याला म्हणावे लागेल.”
पुढे बोलताना शिरसाट म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या पक्षात रोज नवीन प्रवेश सुरू आहेत. पावसाळी अधिवेशनापूर्वी नाही तर आधीपासूनच प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. मुंबईत ४० पेक्षा जास्त नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. याला ऑपरेशन टायगर असे नाव देण्यात आले आहे. सोमवारपर्यंत आणखी मोठे कार्यकर्ते पक्षात येणार आहेत. आमचे टायगर एकनाथ शिंदे हे आहेत.”
“आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. भाजप मोठा भाऊ आहे. निवडणुकीसंदर्भात पक्षाच्या रोजच बैठका होत असतात. त्यामुळे अशा बैठका सातत्याने होत असतात, असे संजय शिरसाट म्हणाले.
संजय राऊत यांच्यावर बोलताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले, ” जे घरात बसलेले होते त्यांना बाहेर काढण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले. एकनाथ शिंदे यांनी कोणाच्या गळ्यातील पट्टा काढला हे सर्वांना माहिती आहे. डॉक्टर आमच्याकडे आहेत, आम्ही फक्त रूग्ण कोण आहे याची वाट पाहतो.”