माळेगाव: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Pune District Bank) संचालकपदी माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांचे पुतणे रणजीत तावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आगामी माळेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्त्वाची मानली जात आहे. (Ranjit Taware as Director of Pune District Bank)
पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगांबर दुर्गाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार संचालक रणजित तावरे यांची निवड करण्यात आली काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या संचालक पदी रणजीत तावरे यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान अजित पवार यांनी संचालक पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचे पुत्र पार्थ पवार यांची संचालक पदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. दरम्यान माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा बाळासाहेब तावरे यांनी दिल्यानंतर त्यांच्या जागी अध्यक्षपदाची माळ पणदरे गटातील दिग्गज नेते असलेले केशवराव जगताप यांच्या गळ्यात पडली. मात्र माळेगाव मध्ये तावरे गट नाराज होऊ नये, याची दक्षता अजित पवार यांनी घेऊन रणजीत तावरे यांची पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड केली आहे. रणजीत तावरे यांची सर्वानुमते निवड झाल्याने माळेगावात युवकांनी एकच जल्लोष केला.