
धुतपापेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था (फोटो सौजन्य - प्रकाश वराडकर)
या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत वारंवार प्रशासनाकडे मागणी करूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे बोलले जात आहे. श्री देव धूतपापेश्वर मंदिराला दररोज राजापूरसह संपूर्ण कोकणातून तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक भेट देत असतात.
सध्या श्रावण महिना सुरू असल्याने मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असून, मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर सतत वाहनांची आणि भाविकांची ये-जा सुरू आहे. मात्र, रस्त्याची दुरवस्था, रस्त्यालगत करण्यात आलेली अनधिकृत बांधकामे, तसेच रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आलेले मातीचे ढिगारे यामुळे वाहनचालक आणि भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
त्यातच रस्त्याच्या काही ठिकाणी संरक्षक कठडे अथवा आवश्यक सुरक्षा व्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, रस्त्यालगतची अडथळे दूर करावीत आणि आवश्यक ठिकाणी संरक्षण व्यवस्था करावी, अशी मागणी भाविक व नागरिकांकडून करण्यात येत आहे. श्रद्धास्थानाकडे जाणारा रस्ता तरी प्रशासनाने सुस्थितीत करावा, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त होत आहे.
Crime News: राजापूरमध्ये महिलेला जीवे मारण्याची धमकी; जमिनीच्या कारणावरुन वाद
राजापूर तालुक्यात असणारे हे मंदिर अत्यंत रम्य असून प्राचीन आहे. प्रशस्त सभामंडप आणि धबधब्यांनी समृद्ध असणारे हे मंदिर अत्यंत निसर्गरम्य असून भाविक इथे श्रद्धेने १२ महिने येत असतात. प्रवेशद्वारावर नगारखाना आणि आवारात असणाऱ्या दीपमाळाही लक्षवेधी असून मंदिराशेजारी असणाऱ्या काळ्या कातळावरून नदीचा प्रवाह येतो आणि पावसाळ्यात या ठिकाणी अधिक गर्दी पहायला मिळते. याशिवाय या धबधब्याच्या खाली एक डोह झालाय, ज्याला कोटितीर्थ असं म्हटलं जातं. इथे पर्यटनासाठी प्रचंड प्रमाणात लोक येत असतात, पण सध्या झालेल्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पर्यटकांनाही त्रास होताना दिसून येत आहे.