चिपळूण नगर परिषदेने वाढीव घरपट्टीबाबत २८ डिसेंबरपर्यंत हरकती नोंदवल्यानंतर सुनावणीनंतरच फेरसर्वेक्षण करावे. सुनावणीअगोदर फेरसर्वेक्षणाला विरोध आहे, अशी भूमिका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनी पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केली आहे.
एकीकडे हरकती नोंदवून घेण्याबरोबरच दुसरीकडे फेर सर्वेक्षणाला सुरुवात
नव्याने आकारणी करण्यात आलेल्या घरपट्टी बाबत चिपळूणवासीयांनी नाराजी व्यक्त करत येथील नगरपरिषदेवर धडक दिली. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील धडक देत मुख्याधिकारी विशाल भोसले यांना निवेदन दिले होते.यावर ज्या नागरिकांना घरपट्टी वाढली आहे, असे वाटत असेल अशा नागरिकांनी २८ डिसेंबर पर्यंत चिपळूण नगर परिषदेत अर्जाद्वारे हरकती नोंदवाव्यात असे आवाहन भोसले यांनी शिवसेना उबाठाच्या शिष्टमंडळाला केले होते.यानुसार चिपळूण नगर परिषदेत घरपट्टी धारक वाढीव घरपट्टी बाबत हरकती नोंदवत आहेत. मात्र, चिपळूण नगरपरिषदेने एकीकडे हरकती नोंदवून घेण्याबरोबरच दुसरीकडे फेर सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. यावर शिवसेना उबाठा पक्षाने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
सुनावणी अगोदर फेरसर्वेक्षणाला आमचा विरोध
यावेळी शहर प्रमुख शशिकांत मोदी यांनी सांगितले की, वाढीव घरपट्टी बाबत प्रथम शिवसेना उबाठा पक्षाने चिपळूण नगर परिषदेवर धडक देत मुख्याधिकारी विशाल भोसले यांना निवेदन दिले. यावेळी नगर परिषदेने २८ डिसेंबरपर्यंत हरकती नोंदवण्यास सांगितले. याबाबत आमचे कोणतेही दुमत नाही. परंतु, प्रथम हरकतींवर सुनावणी व्हावी. यासाठी जे घरपट्टीधारक आहेत. त्यांना याची पूर्वकल्पना देण्यात यावी. नंतर फेरमोजणी कधी होणार आहे, याची देखील माहिती देण्यात यावी. मात्र, आता सुनावणी अगोदर फेरसर्वेक्षण सुरू झाले आहे. या सर्वेक्षणाला आमचा विरोध आहे, असे मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.
चिपळूण नगरपरिषदेसमोर साखळी उपोषण
तर आम्ही घरपट्टीधारकांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने २३ ते २५ डिसेंबर रोजी चिपळूण नगर परिषदेसमोर साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी परवानगी प्रशासनाकडे मागण्यात आली. परंतु, प्रशासनाने परवानगी दिली नसल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.
या पत्रकार परिषदेला तालुकाप्रमुख विनोद झगडे, माजी नगरसेवक संजय रेडीज, विकी नरळकर, सचिन उर्फ भैया कदम, पार्थ जागूष्टे, संतोष पवार, प्रशांत मुळे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी शरद पवार गटही सर्वेक्षणावरुन आक्रमक
चिपळूणमधील नागरिकांच्या मालमत्ता कर आकारणीकरिता पालिकेने नियुक्त केलेल्या एजन्सीने चुकीचे सर्वेक्षण केले आहे. त्यामुळे शहरातील असंख्य नागरिकांच्या घरपट्टीमध्ये वाढ झाली आहे. ज्यांनी घरात कोणतेही बांधकाम वाढवले नाही, अशा नागरिकांची देखील घरपट्टी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने फेर सर्वेक्षण करावे, त्यानंतरच नविन मालमत्ता आकारणी करावी अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली.वाढीव घरपट्टीवर शहरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सामान्य नागरिकांवर अन्याय होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव, माजी आमदार रमेश कदम आदींच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी पालिकेवर धडक देत वाढीव घरपट्टीवर जाब विचारला.