प्रशांत यादव म्हणाले की, “हा कृषी महोत्सव चिपळूणमध्ये सलग तिसऱ्या वर्षी यशस्वीपणे होत असून, आमचे मार्गदर्शक नेतृत्व माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेब यांच्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी काम करताना आम्हाला एक ठोस दिशा मिळाली आहे. कोकणाचा चेहरा बदलण्याचे काम दादांनी केले असून, शेती व शेतीपूरक उद्योग उभे करण्याचे कार्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.”
वाशिष्ठी डेअरीची संकल्पना 2021 साली चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली साकार झाली. सहकार क्षेत्रात काम करताना केवळ कर्जपुरवठा न करता, शेतकऱ्यांची कर्जफेड करण्याची क्षमता वाढवणारी यंत्रणा उभी राहिली पाहिजे, या उद्देशाने वाशिष्ठी डेअरीची संकल्पना पुढे आली, असे यादव यांनी सांगितले.
दुसऱ्या वर्षी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून हा उपक्रम अधिक व्यापक झाला. परिणामी दूध संकलन 25 हजार लिटरपर्यंत पोहोचले आणि 7ते ८ हजार शेतकरी या प्रकल्पाशी जोडले गेले. आज, तीन वर्षांच्या कालावधीत वाशिष्ठी डेअरीकडून दररोज सुमारे 55 हजार लिटर दूध संकलन केले जाते आणि 13 हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर दर दहा दिवसांनी थेट पैसे जमा केले जातात.
या कृषी महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली असून, येत्या पाच दिवसांत 7 ते 8 लाख नागरिक या प्रदर्शनाला भेट देतील, असा विश्वास प्रशांत यादव यांनी व्यक्त केला. मागील वर्षी साडेपाच लाखांहून अधिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली होती.प्रदर्शनस्थळी 15 ते 20 गुंठ्यांवर प्रत्यक्ष ‘लाईव्ह डेमो शेती’ उभारण्यात आली आहे. चार जनावरांच्या दुग्धव्यवसायासोबत कुक्कुटपालन, शेळीपालन, भाजीपाला व फळबाग लागवड केल्यास शेतकऱ्याला दरमहा 30 ते 35 हजार रुपयांचे शाश्वत उत्पन्न कसे मिळू शकते, याचे प्रात्यक्षिक येथे दाखवण्यात येत आहे.
कोकणातील भौगोलिक परिस्थिती, पारंपरिक व्यवसाय आणि उपलब्ध मनुष्यबळ लक्षात घेऊन दुग्धव्यवसाय हाच शाश्वत पर्याय असल्याचे लक्षात आल्यानंतर वाशिष्ठी डेअरीची स्थापना करण्यात आली. 1967 साली सुरू झालेली चिपळूण डेअरी 2000 साली बंद पडल्याने जिल्ह्यातील दुग्धव्यवसायाला मोठा फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर नव्या दमाने दुग्धव्यवसाय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
2021 मध्ये वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाची सुरुवात झाली. अवघ्या एका वर्षात प्रकल्प पूर्ण करून 2022 मध्ये दूध उत्पादन सुरू झाले. सुरुवातीला केवळ 400 लिटर दूध आणि 60 शेतकरी या प्रकल्पाशी जोडलेले होते. मात्र एका वर्षातच दूध संकलन 1 17,500 लिटर झाले आणि 2000 शेतकरी या प्रकल्पाशी जोडले गेले.
तसेच काजू व फळपिक योजनांच्या माध्यमातून 122 शेतकऱ्यांना शासन व बँक यंत्रणेशी जोडण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून किमान 100 ते 200 शेतकरी स्वयंपूर्ण व्हावेत, हा आमचा उद्देश असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले. “कोकणातील माणूस काही करू शकत नाही, हा गैरसमज आज या प्रदर्शनामुळे दूर होत आहे. पारदर्शक कारभार आणि विश्वासार्हतेमुळे आज हजारो शेतकरी आमच्यासोबत उभे आहेत. काही शेतकरी महिन्याला दोन ते अडीच हजार रुपयांपासून ते साडेतीन-चार लाख रुपयांपर्यंत उत्पन्न घेत आहेत,” असेही यादव यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चिपळूण नागरी पतसंस्था, वाशिष्ठी डेअरीची संपूर्ण टीम, स्थानिक ग्रामस्थ तसेच व्यवस्थापनात रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या स्वप्ना यादव मॅडम व सहकाऱ्यांचे यादव यांनी विशेष आभार मानले. शासन व लोकप्रतिनिधींनी या उपक्रमाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, जेणेकरून कोकणातील शेती, दुग्धव्यवसाय आणि ग्रामीण युवकांना शाश्वत रोजगार मिळेल असा आशावाद प्रशांत यादव यांनी व्यक्त केला.






