फोटो - सोशल मीडिया
बुलढाणा : राज्याचे आरोग्य मंत्री असलेले तानाजी सावंत यांच्या मुजोर बोलण्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. कालपासून तानाजी सावंत हे त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. यापूर्वी सावंत यांनी अजित पवार यांच्यासंबंधी वक्तव्य केले होते. त्यानंतर आता त्यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या उल्लेखामुळे राज्यभरातूनन नाराजी व्यक्त केली जात आहे. एका शेतकऱ्याने मंत्री तानाजी सावंत यांना प्रश्न विचारताच त्यांनी शेतकऱ्यंची औकाद काढली. यावरुन आता शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. हे आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
काय म्हणाले मंत्री तानाजी सावंत?
पिंपळगाव येथील कार्यक्रमामध्ये शेतकरी श्रीधर कुरुंद यांनी बंधाऱ्याच्या दरवाज्या संबंधित मंत्री तानाजी सावंत यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केला. यावर त्यांनी दरवाजा बांधून घेऊ असे उत्तर दिले. यावर शेतकऱ्यांनी बंधाऱ्याची दुरूस्ती करणे आवश्यक असल्याचे सांगितले. मात्र यावर समाधानकारक उत्तर न देताना तानाजी सावंत यांनी अरेरावीची भाषा वापरली. मंत्री सावंत म्हणाले, “उगाच कोणाची तरी सुपारी घेऊन बोलायचं नाही. लायकीत राहून बोलायचं. ऐकून घेतो म्हणून काहीही बोलायचं नाही. औकातीत राहून विकास करून घ्यायचा, आम्ही उडत्याचे मोजतो,” अशी दमदाटी तानाजी सावंत यांनी केली.
हे देखील वाचा : तानाजी सावंतांचा आणखी एक प्रताप; शेतकऱ्याच्या प्रश्नावरून थेट लायकीच काढली
रविकांत तुपकर यांचा संताप
यावर शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. तानाजी सावंत यांना प्रत्युत्तर देताना तुपकर म्हणाले, “हे अतिशय दुर्दैवी आहे. सत्तेतील लोकांनी अतिशय विनम्र राहायला हवे. सरकारच्या भरवशावर तुम्ही जिवंत आहात. शेतकऱ्यावर जर कोणी दादागिरी करत असेल, अर्वाच्च भाषेत बोलत असेल तर हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही. आम्ही त्या नेत्याला धडा शिकविणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी अॅट्रॉसिटी सारखा कायदा आणला पाहिजे,” अशी मागणी तुपकर यांनी केली. याचबरोबर “सोयाबीन, कापूस आणि शेती पिकाला योग्य भाव मिळावा, 100 टक्के पिक विमा मिळावा, तसेच इतर मागण्या 3 सप्टेंबरपर्यंत मंजूर करा. अन्यथा 4 सप्टेंबरपासून सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर बेमुदत अन्न त्याग आंदोलन करू,” असा इशारा रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.