अमरनाथ यात्रेकरूंची नोंदणी थंडावली ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
नाशिक : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर जिल्ह्यातील अमरनाथ यात्रेकरूंची नोंदणी प्रक्रिया थंडावली आहे. गेल्या आठवड्यात जम्मू अँड काश्मीर बँकेत नोंदणी करण्यासाठी भाविकांची गर्दी होत होती. मात्र, हा हल्ला झाल्यानंतर दिवसभरात 8 ते 10 भाविकही नोंदणीसाठी येत नसल्याची माहिती जम्मू अँड काश्मीर बँकेच्या व्यवस्थापकांनी दिली.
अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी दोन मार्ग आहे. एक पहलगाम येथून तर दुसरा बालठाण येथून. मात्र, भाविक पहलगाम मार्गाचा अधिक वापर करत असतात. येथूनच अमरनाथ यात्रेला प्रारंभ होतो. मात्र, तेथेच भयावह दहशतवादी हल्ला झाल्यामुळे भाविकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे भाविक अमरनाथला जाणे टाळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
हेदेखील वाचा : महाराष्ट्र पोलिसांबाबतचे ‘ते’ विधान आमदार संजय गायकवाड यांना भोवलं; मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर केली ‘ही’ मोठी कारवाई
गेल्या आठवड्यात जम्मू अँड काश्मीर बँकेत भाविकांची गर्दी वाढल्याने पोलिस बोलवावे लागले होते. तेथेच शुक्रवार रोजी दिवसभरात 10 भाविकही नोंदणीसाठी आले नसल्याचे दिसून आले. दरम्यान, 3 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार असून, शुक्रवारपर्यंत 13 जुलैपर्यंतची नोंदणी पूर्ण झाली होती. जम्मू अँड काश्मीर बँकेतून जवळपास 1000 लोकांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. दररोजच्या तुलनेत 30 ते 40 टक्केच नोंदणी होत असल्याचेही वाघ यांनी सांगितले.
‘या’ कागदपत्रांची आवश्यकता
सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी सहजासहजी परवानगी मिळत नाही. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक अथवा ग्रामीण रुग्णालयातील प्रमुखांचे प्रकृती तंदुरूस्त असल्याचा दाखला आणावा लागतो. अमरनाथ यात्रेसाठी दोन मार्ग आहेत. पहिला पहेलगाम मार्गे आहे. या मार्गे एका दिवसात यात्रा पूर्ण करता येऊ शकते तर दुसरा मार्ग बालठाण मार्गे आहे. येथून गेल्यास दोन दिवस यात्रेला लागतात.