वाई तालुक्यातील ‘धरणाखालचा रस्ता’ अर्धवट; नागरिकांत तीव्र संताप, आंदोलनाचाही इशारा
वाई : वाई तालुक्यातील पश्चिम भागाला जोडणारा आणि सामाजिक नातेसंबंध दृढ करणारा म्हणून ओळखला जाणारा ‘धरणाखालचा रस्ता’ सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. हा रस्ता पूर्णत्वास न नेता अर्धवट सोडण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही अधिकाऱ्यांकडून ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
विशेष म्हणजे, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यावर केवळ बोर्ड लावून काम पूर्ण झाल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे नागरिकांची दिशाभूल झाल्याचा आरोप होत आहे. हा रस्ता केवळ वाहतुकीसाठी नसून, धरणाच्या दोन्ही बाजूंवरील लोकांना त्यांच्या नातेवाईकांशी, माहेरवाशीणींशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, सध्या रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की, या मार्गाने प्रवास करताना नागरिकांना घसरून पडण्याची भीती सतत वाटत आहे. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून, नागरिकांच्या मनात शासनाविषयी अविश्वास निर्माण होत आहे.
Wai News : वाई शहरात दारुड्यांची हुल्लडबाजी ! यशवंतराव चव्हाण शॉपिंग सेंटरला बनवले दारुचा अड्डा
स्थानिकांच्या मते, ठेकेदार आपल्या मनमानीने काम करत असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी केवळ कागदोपत्री काम उरकत असल्याचे चित्र दिसत आहे. विभागीय अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने ठेकेदारांना मोकळीक मिळत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
…तर नागरिक जनआंदोलन छेडतील
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले हे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे, अन्यथा दोन्ही भागातील नागरिक रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच, या प्रकरणाची तक्रार संबंधित मंत्र्यांपर्यंत व आमदार मकरंद पाटील यांच्या निदर्शनास आणून देण्याचा निर्धारही नागरिकांनी व्यक्त केला आहे.
अनेक दिवसांपासून धरणाखालचा रस्ता बनवण्याचे काम सुरु
अनेक दिवसांपासून धरणाखालचा रस्ता बनवण्याचे काम चालू आहे. मात्र, या रस्त्यात केवळ मुरूम टाकण्यात आला असून, त्यावर एक थर खडीचाच फक्त टाकला आहे. बाकी सर्व मुरुमच आहे तोही मुरूम धरणाच्या हद्दीतील डोंगर माथ्यातून उकरून आणलेला आहे याची रॉयल्टी भरली का नाही ही सुद्धा महसूल विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना माहिती नसेल या रस्त्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.






