संग्रहित फोटो
तासगाव/ मिलिंद पोळ : तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीतील अर्ज माघारीची प्रक्रिया संपताच राजकीय तापमान अक्षरशः उसळले आहे. ४३ पैकी ३४ अर्ज मागे घेतल्यानंतर नगराध्यक्षपदाची निवडणूक पंचरंगी झाली असून, नगरसेवकपदासाठी तब्बल ८८ उमेदवार मैदानात उरले आहेत. तासगावचे राजकारण पुन्हा एकदा पारंपरिक ‘आबा विरुद्ध काका’ या दोन शक्तिकेंद्रांच्या संघर्षात विभागले गेले असून, यंदाची निवडणूक आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय पाटील या दोन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेची ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महत्वाची बाब म्हणजे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांच्या पत्नी स्मिता महादेव पाटील यांनी शेवटच्या क्षणी आपला थेट नगराध्यक्षपदाचा अपक्ष अर्ज मागे घेतला. काका गटाचे माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील यांनीही प्रभाग ३ मधील आपली उमेदवारी मागे घेतल्याने दोन्ही गटांच्या अंतर्गत समीकरणांमध्ये बदल झाला आहे. उमेदवारी नाकारलेल्या अनेक मातब्बरांनी बंडखोरी करत अपक्ष भूमिका घेतल्यामुळे यावेळी निवडणुकीचा कॅनव्हास पूर्वीपेक्षा अधिक रंगतदार झाल्याचे चित्र आहे.
नगराध्यक्ष पदासाठी पंचरंगी लढत
शेवटी नगराध्यक्षपदासाठी खालील पाच उमेदवार मैदानात राहिले,
वासंती बाळासो सावंत – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) – आमदार रोहित पाटील गट
विजया बाबासो पाटील – स्वाभिमानी विकास आघाडी – माजी खासदार संजय पाटील गट
ज्योती अजय पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
विद्यासागर चव्हाण – भाजप
रंजना अंकुश चव्हाण – शिवसेना (उद्धव ठाकरे गट)
या पाचही उमेदवारांच्या पाठीशी वेगवेगळे राजकीय प्रवाह असले तरी खरी स्पर्धा रोहित पाटील आणि संजय पाटील यांच्या गटांमध्येच रंगणार आहे, अशी चर्चा तासगावभर सुरू आहे. दोन्ही नेत्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारीला वेग दिला असून, शहरात पोस्टर, सोशल मीडिया आणि कार्यकर्ता मेळाव्यांचा जोर वाढलेला दिसत आहे.
नगरसेवकपदासाठी ८८ उमेदवार
२४ जागांसाठी तब्बल ८८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी अनेक ठिकाणी तिरंगी–चौरंगी लढती अटळ आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार), स्वाभिमानी विकास आघाडी, भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (उद्धव) तसेच अपक्ष उमेदवार यांच्यात काट्याची टक्कर होण्याची चिन्हे आहेत. अपक्षांना २६ नोव्हेंबर रोजी चिन्ह मिळणार असल्याने त्यांच्या प्रचाराला अजून वेग येण्याची शक्यता आहे.
तासगावातील राजकारण पारंपरिकदृष्ट्या दोन प्रमुख गटांमध्ये विभागलेले आहे. आमदार रोहित पाटील (आबा गट), माजी खासदार संजय पाटील (काका गट) या दोन्ही नेत्यांची वैचारिक, सामाजिक आणि संघटनात्मक पकड या निवडणुकीत कसोटीवर लागली आहे. रोहित पाटील यांच्यासाठी ही निवडणूक तालुक्यातील नेतृत्वशक्ती पुन्हा अधोरेखित करण्याची संधी. तर संजय पाटील गटासाठी विकास आघाडीचा प्रभाव टिकवून ठेवण्याची आणि ‘काका गट अजूनही मजबूत आहे’ हे सिद्ध करण्याची निर्णायक वेळ. दोन्ही बाजूंकडून प्रचारात वेगवेगळ्या रणनीती आखल्या जात असून, काही प्रभागात तडजोडी झाल्या असल्या तरी गटांच्या प्रतिष्ठेला धक्का बसू नये याची काळजी घेतली जात आहे.
तासगावकरांची नजर दोन्ही गटांच्या प्रतिष्ठेच्या लढाईवर
अर्ज माघारीनंतरच्या बदललेल्या चित्रामुळे तासगावातील निवडणूक ही केवळ पक्षीय नव्हे तर दोन प्रभावी राजकीय घराण्यांच्या प्रतिष्ठेचा संग्राम ठरली आहे. शहरातील मतदारांमध्येही या निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली असून प्रचार मोहीम सुरू होताच वातावरण आणखी तापणार, यात शंका नाही.






