Ashok Kharat Case : SIT चौकशीलाच चाकणकरांची दांडी; कारण दिलं 'प्रवास करण्यास असमर्थ...'
मुंबई : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले. याच प्रकरणातून रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता याप्रकरणाची विशेष तपास पथक अर्थात एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. रुपाली चाकणकर यांनी खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीपुढे हजर राहण्यास टाळाटाळ सुरू केली आहे.
सोमवारी त्यांची या प्रकरणी चौकशी होण्याची शक्यता होती. पण त्यांनी महिला असल्यामुळे प्रवास करण्यास असमर्थ असल्याचे नमूद करत ही चौकशी टाळली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चाकणकरांनी दिलेले कारण अत्यंत विक्षिप्त व क्षुल्लक असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, चाकणकर या भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टवर सदस्या आहेत. त्यांच्यावर भोंदू खरातचे प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकल्याचाही आरोप आहे. हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर त्यांना प्रथम राज्य महिला आयोग व त्यानंतर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.
आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार, सोमवारी त्या चौकशीसाठी हजर राहणे अपेक्षित होते. पण त्यांनी चौकशीसाठी हजर राहणे टाळले. त्यामुळे त्यांच्या हेतूवर संशय व्यक्त केला जात आहे.
चाकणकरांचे कारण अत्यंत विक्षिप्त : अंजली दमानिया
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चाकणकरांवर हल्ला चढवत त्यांनी चौकशीला गैरहजर राहण्यासाठी फार किरकोळ कारण दिल्याचा दावा केला आहे. त्या म्हणाल्या, रुपाली चाकणकरांना एसआयटीने समन्स बजावले होते. पण आता कळत आहे की, त्या एसआयटीपुढे जाणार नाहीत. त्यासाठी त्यांनी कारण एवढे क्षुल्लक व विक्षिप्त दिले गेले की, मी एक महिला आहे व मला प्रवास करायला त्रास होईल. हे कारण नक्कीच असू शकत नाही. कारण, याच रुपाली चाकणकरांना आपण तिथे अनेकदा जाताना पाहिले आहे. त्यांच्या भाषणाचे व्हिडिओ पाहिलेत. त्यांचे पदराने पाय पुसतानाचे व्हिडिओ पाहिलेत. केक खातानाचे व्हिडिओ पाहिलेत.
आता कधी एसआयटीपुढे जातात ते पाहू…
आता पाहू त्यांना कधी बुद्धी येते व कधी डोक्यात प्रकाश पडून त्या एसआयटीपुढे जातात. त्यांना खरोखर काही लपवायचे नसते, तर त्या नक्कीच गेल्या असत्या, पण आज त्या चौकशीसाटी एसआयटीकडे गेल्या नाहीत, त्यावरून आपल्याला बरेच काही कळते, असे दमानिया यांनी म्हटले आहे.
महिला व बालकल्याण मंत्र्यांचे मौन का?
अंजली दमानिया यांनी यावेळी याप्रकरणी राज्याच्या महिला व बाल कल्याणमंत्री आदिती तटकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. महिला व बालकल्याण मंत्री यांना एक साधा प्रश्न; अशोक खरतांच्या प्रकरणावर तुमचे मौन का? एक महिला व बालकल्याण मंत्री म्हणून त्या इतक्या गंभीर प्रकरणावर काहीच कसं बोलत नाहीत? असा प्रश्न त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.
हेदेखील वाचा : Sanjay Raut On Ashok Kharat : “अशोक खरातांच्या पाठीशी सरकार…”, संजय राऊतांच्या आरोपांनंतर राजकारणात खळबळ






