Photo Credir- Social Media सदा सरवणकर अमित ठाकरेंविरोधात निवडणूक लढण्यावर ठाम
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सध्या हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, अमित ठाकरेंना बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका महायुतीने घेतली आहे. महायुतीतील शिंदे गट आणि भाजपच्या काही नेत्यांनी तशी इच्छाही व्यक्त केली आहे. पण या जागेवरून शिंदे गटाचे सदा सरवणकर यांनी अर्ज भरला असून माहीममधून माघार घेण्यास विरोध केला आहे.
यावरून प्रश्न उपस्थित होऊ लागले असताना, सदा सरवणकर यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. ” कोणत्याही परिस्थितीत मी माहीत मतदारसंघातून माघार घेणार नाही, मी विधानसभेची निवडणूक लढवणारच आहे. मी वेळोवेळी सांगितले आहे. माघार घेण्याचा प्रश्नच उरत नाही. मला एबी फॉर्मही दिला आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून मी फॉर्म भरला आहे आणि निवडणूकही लढवणार आहे.” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा: ‘रश्मी शुक्ला भाजपसाठी काम करतात, आमचा फोन…’ , महाराष्ट्राच्या डीजीपीवर संजय राऊतांचा आरोप
सरवणकर म्हणाले, दिवाळीच्या दारात कुणाच्या दारात जाऊन, आपल्याच कार्यकर्त्यांना आणि माता भगिनींना गुंतवून ठेवणे, हे मला पटत नाही. तरीही माझ्या आज तीन चार बैठका आहेत, मी वर्षा बंगल्यावर गेलो पण मुख्यमंत्र्यांशी भेट झाली नाही, काही छोटी-मोठी कामे असतात, आमदार म्हणून ती इतर स्टाफच्या माध्यमातून होतात. दरवेळी मुख्यमंत्र्यांना भेटणे गरजेचेच नसते. असेही सरवण करांनी स्पष्ट केले.
दरम्यान काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी मुख्यमंत्रीपदावर भाष्य केले होते. त्यावरही सदा सरवणकरांनी राज ठाकरेंवर टीका केली. ज्याचा एकही आमदार नाही,त्यांनी मुख्यमंत्री कोण होणार हे सांगणे हास्यास्पद आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा निर्णय महायुती घेईल, असा टोला सरवणकरांनी लगावला होता.
हेही वाचा: अमित ठाकरे लागले प्रचाराला! बायकोसह दिल्या मतदारांच्या घरी भेटी
तर, दिवंगत बाळासाहेबांनी कधीही निवडणूक लढवली नाही, त्यांनी नेहमी शिवसैनिकाला मोठं केलं राज ठाकरे यांच्याकडे आम्ही बाळासाहेबांची प्रतिकृती म्हणून पाहतो. राज ठाकरे माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला आशीर्वाद देतील, अशी अपेक्षा आहे. म्हणून मी राज ठाकरेंना भेटून विनंती करणार आहे. मागील 30 वर्षांपासून माझं आणि मतदारसंघाचे आई-मुलासारखं नातं आहे. ते अबाधित ठेवण्यासाठी मी वेळ मागितली आहे. असेही सरवणकरांनी म्हटलं आहे.