पनवेल ग्रामीण : उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कॉलनी फोरमच्या अध्यक्ष लीना गरड यांनी सोमवारी ( ता.15 ) शिव सेनेत प्रवेश केला. कॉलनी फोरमच्या अध्यक्ष गरड या पनवेल पालिकेच्या माजी नगरसेविका असून, दुहेरी मालमत्ता करा विरोधात आक्रमक भूमिका घेत त्या पालिकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपा पासून दूर झाल्या होत्या. दादर येथील शिवसेना भावनांत पार पडलेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यावेळी शिवसेना (उभाठा) गटाचे पनवेल मधील कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गरड यांच्या सोबत कॉलनी फोरमच्या कामोठे, खारघर तसेच पनवेलमधील असंख्य कार्यकर्त्यांनी देखील उबाठा गटात प्रवेश केला. त्यामुळे पनवेलमध्ये उबाठा गटाची ताकत वाढणार असून, आगामी लोकसभा निवडणुकीत याचा फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना होण्याची शक्यता आहे. पक्षप्रवेश सोहळ्यावेळी मावळ लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील, उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख शिरीष घरत, पनवेल विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, खारघर मधिल पदाधिकारी नंदू वारुंगसे उपस्थित होते.