फोटो सौजन्य - सोशल मीडिया
जेजुरी : राज्यभरामध्ये आषाढी वारीचा उत्साह आहे. अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहेत. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जेजुरीनगरीमध्ये दाखल झाली आहे. श्री खंडेरायाच्या नगरीमध्ये माऊलींच्या पालखीला हळद लागली आहे. गावामध्ये पालखीचे दिमाखदार स्वागत झाले. यावेळी गावकऱ्यांनी माऊलींच्या रथावर बेल भंडाऱ्याची मुक्त उधळण केली.
काल (दि.5) सासवडमधून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाले. सकाळी साडे सातच्या सुमारास पालखीने जुजेरीचा रस्ता धरला. सासवडवरुन निघाल्यानंतर पालखीने सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जेजुरीमध्ये प्रवेश केला. जेजुरी नगरीत प्रवेश केल्यानंतर खंडोबा देवस्थान आणि जेजुरी नगरपालिकेच्या वतीने रथावर भंडाऱ्याची उधळण करीत स्वागत करण्यात आले. यावेळी संपूर्ण पालखी सोहळ्या हळदीमध्ये न्हाऊन गेला होता. हे दृश्य अगदी विहंगम होते. ऐतिहासिक होळकर तलावाकाठी असलेल्या पालखी तळावर समाज आरती करण्यात आली.
सासवड ते जेजुरी हा 17 किलोमीटरचा टप्पा पार केला. खंडोबाचा गड दिसू लागल्यावर वारकऱ्यांमध्ये एकच उत्साह दिसून आले आहे. पालखी सोबत असलेल्या दिंडीतील वारकऱ्यांनी खंडेरायांची गाणी, अभंग, भारुडे म्हणत जेजुरीमध्ये प्रवेश केला. मल्हारी वारी मागत जेजुरीचा खंडोबा व पंढरीचा विठोबा दोन्ही देवांची महती वारकऱ्यांनी गायली.