Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले, सौजन्य : सोशल मीडिया
रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी सुरू असलेल्या ब्लास्टिंगच्या पद्धतीवर या घटनेनंतर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरक्षेच्या उपाययोजना न करता डोंगर फोडण्याचे काम सुरू असल्यामुळेच दरड कोसळल्याचा आरोप स्थानिक नागरिक व पर्यटकांनी केला आहे. त्यामुळे संबंधित कामाची तांत्रिक पाहणी करून ब्लास्टिंगसाठी आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
दरड कोसळल्यानंतर घाटरस्त्यावर मोठमोठे दगड आणि मातीचा ढिगारा साचला. त्यामुळे सज्जनगडाकडे जाणारी तसेच गडावरून परतणारी वाहने मार्गातच अडकली. अचानक वाहतूक बंद झाल्याने भाविक आणि पर्यटकांची मोठी गैरसोय झाली. काही काळ या परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीसह अन्य यंत्रसामग्रीच्या मदतीने रस्त्यावरील दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, डोंगराच्या कड्यावर अजूनही धोकादायक स्थिती असल्यास सुरक्षिततेची खात्री करूनच वाहतूक सुरू करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
रुंदीकरण आवश्यक असले तरी त्यासाठी भाविकांच्या सुरक्षिततेशी तडजोड केली जाणार नाही ना? असा सवाल या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. ब्लास्टिंगचे नियोजन, सुरक्षाव्यवस्था आणि कामाची तांत्रिक पद्धत याची प्रशासनाने तातडीने तपासणी करण्याची मागणी होत आहे.
दरड पूर्णपणे हटवून रस्ता सुरक्षित होईपर्यंत नागरिकांनी सज्जनगड घाटातून प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






